चेन्नई : आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातली पहिली मॅच गतविजेती चेन्नई आणि बंगळुरुमध्ये होईल. पण आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नईच्या टीमला मोठा झटका बसला आहे. चेन्नईच्या टीममधला महत्त्वाचा खेळाडू लुंगी एनगीडी आयपीएलला मुकणार आहे.
आयसीसीच्या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेवेळी दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगीडीच्या मांसपेशींना दुखापत झाली. आता एनगीडीला चार आठवड्यांचा आराम करावा लागणार आहे. यानंतर एनगीडीच्या रिहॅबिलिटेशनला सुरुवात होईल.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे प्रशासक डॉ. मोहम्मद मुसाजी म्हणाले, 'एनगीडीला श्रीलंकेविरुद्धच्या न्यूलॅण्ड्समध्ये झालेल्या शेवटच्या वनडेवेळी बॉलिंग करताना त्रास व्हायला सुरुवात झाली. यामुळे त्याला लगेचच बॉलिंगपासून रोखण्यात आलं. यानंतर एनगीडीच्या मांसपेशींना दुखापत झाल्याचं आमच्या लक्षात आलं. आता त्याला ४ महिने आराम करण्याची गरज आहे.'
२२ वर्षांच्या लुंगी एनगीडीने मागच्या मोसमात चेन्नईकडून खेळताना ७ मॅचमध्ये ११ विकेट घेतल्या होत्या. मागच्या मोसमात चेन्नईला आयपीएल जिंकवून देण्यात एनगीडीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.