जेव्हा हरभजनने श्रीसंथच्या कानाखाली पेटवली, नक्की काय झालं अन भज्जी भडकला?

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात हरभजनने श्रीसंथला भर मैदानात सामन्यादरम्यान थोबाडीत पेटवून दिली. 

Updated: May 20, 2021, 02:38 PM IST
जेव्हा हरभजनने श्रीसंथच्या कानाखाली पेटवली, नक्की काय झालं अन भज्जी भडकला?  title=

मुंबई : हरभजन सिंह आणि एस श्रीसंथ. दोघेही आक्रमक आणि तापट स्वभावाचे भारतीय क्रिकेटपटू. श्रीसंथने भर सामन्यात केलले कारनामे क्रिकेट चाहत्यांना चांगलेच लक्षात आहेत. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात हरभजनने श्रीसंथला भर मैदानात सामन्यादरम्यान थोबाडीत पेटवून दिली. जेंटलमन गेम असलेल्या क्रिकेटला काळिमा फासली गेली होती. पण नक्की असं काय झालं, अन् भज्जी भडकला? याबाबत आपण इनसाईड स्टोरी जाणून घेणार आहोत.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटीचा शेवटचा दिवस होता. सामन्याचे आयोजन चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. सामना ड्रॉ होण्याची चिन्हं होती. पण आफ्रिकेला स्वस्तात गुंडाळून माफक आव्हानाचं पाठलाग करुन सामना जिंकण्याची शक्यता होती. टीम इंडियाचे गोलंदाज यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. भारताच्या नेतृत्वाची धुरा अनिल कुंबळेकडे होती. हरभजनने पहिल्या इनिंगमध्ये फिरकीने शानदार कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्या डावात  भज्जी एका बाजूने बॉलिंग करत होता.  

आफ्रिकेकडून हाशिम अमला आणि नील मॅकेंजी मैदानात पाय रोवून उभे होते. दोघांनी 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. आफ्रिकेने केवळ 1 विकेट गमावली होती. ती एकमेव विकेटही भज्जीने घेतली होती.

भज्जी पाचव्या दिवसातील नववी ओव्हर टाकायला आला. समोर अमला होता. भज्जीने टाकलेल्या बॉलवर अमलाने स्वीप शॉट मारला. पण तो फटका अचूक बसला नव्हता. अमलाने मारलेला फटका लॉन्ग लेगच्या दिशेने गेला. तिथे श्रीसंथ उभा होता. श्रीसंथसाठी सोप्पा कॅच होता. मात्र श्रीने हा कॅच सोडला. कॅच सोडल्याने भज्जी चांगलाच चिडला. कॅच सोडल्याने श्रीसंथ भज्जीच्या डोक्यात गेला होता.

3 ओव्हरनंतर आरपी सिंह बॉलिंग करायला आला. मॅकेंजीने ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेल्या चेंडूवर जोरदार फटका मारला. पॉइंटवर असलेला भज्जी चेंडूच्या दिशेने बाऊंड्री रोखण्यासाठी वेगात धावत गेला. जिथे 4 धावा होत्या तिथे भज्जीने चेंडू आडवत 1 धावही आफ्रिकेला मिळू दिली नाही. भज्जीने कॅच सोडलेल्या श्रीसंथकडे रोखून पाहिलं. फिल्डिंग अशी करायची, हे भज्जीने श्रीसंथकडे रोखून त्याला दाखवून दिलं.  
 
या सामन्यानंतर हरभजन आणि श्रीसंथमध्ये कटुता आली. आफ्रिकेच्या खेळाडूंनी हरभजन आणि श्रीसंथची तक्रार करण्यात आली. प्रकरण मॅच रेफरीपर्यंत गेलं. मात्र हरभजनने माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणाला तिथेच पूर्णविराम मिळालं. हरभजनसाठी हा मोठा दिलासा होता. कारण हरभजन त्याआधी मंकीगेट प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत होता.  

"श्रीसंथने सामन्यादरम्यान एबी डीव्हीलियर्सवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मात्र एबीने याकडे दुर्लक्ष केलं. मैदानात हरभजन आणि श्रीसंथसारखे 2 वादग्रस्त खेळाडू असताना काहीही शक्य आहे", असं आफ्रिकेचे कोच मिकी आर्थरने सामन्यानंतर सांगितलं.

या सर्व वादानंतर अखेर ही मालिका पूर्ण झाली. त्यानंतर पुढील 5 दिवसांनी बहुप्रतिक्षित आयपीएलच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली. हरभजनला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. तर श्रीसंथला किंग्स इलेव्हन पंजाबने (PBKS) आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईने पहिले 2 सामने गमावले होते. मुंबईची तिसऱ्या सामन्यात पंजाब विरुद्ध गाठ पडली. सामन्याची तारीख होती 25 एप्रिल 2008. मॅचचे मोहालीमध्ये आयोजन करण्यात आले होते.

मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी ही सचिन तेंडुलकरकडे होती. सचिनला आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. त्यामुळे हरभजनला कॅपटन्सी देण्यात आली. आधीच सचिन दुखापतग्रस्त त्यात सलग 2 पराभव. त्यामुळे हरभजनवर मुंबईला विजय मिळवून देण्याचं दडपण होतं.

भज्जी आपल्या होमपिचवर पंजाब विरुद्ध खेळत होता. नेहमीच हरभजनला सपोर्ट करणारे पंजाबमधील क्रिकेट चाहते हे केरळमधून आलेल्या श्रीसंथच्या पंजाब टीमला सपोर्ट करत होते. भज्जीने टॉस जिंकला. पंजाबला बॅटिंगासाठी भाग पाडले. पंजाबने संगकाराच्या 94 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 182 धावा केल्या. 

मुंबईला विजयासाठी 183 धावांचे आव्हान मिळाले. मुंबईकडे सनथ जयसूर्या, ल्युक रोंची, ड्वेन ब्रावो आणि रॉबिन उथप्पासारखे तोडीसतोड फलंदाज होते. त्यामुळे सामना अटीतटीचा होणार, अशी चिन्हं होती. मात्र हे सर्व फलंदाज अपयशी ठरले. मुंबईची 94 धावांवर 6 विकेट्स अशी स्थिती झाली.

यानंतर हरभजन मैदानात आला. इरफान पठाणने हरभजनला पहिल्याच बॉलवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. श्रीसंथला भज्जी आऊट झाल्याचा आनंद झाला. त्यामुळे श्रीसंथ मैदानातच जल्लोष करायला लागला. आधीच हरभजनच्या डोक्यात श्रीसंथने कॅच सोडल्याचा राग होता. त्यात आता आऊट झाल्यानंतर श्रीसंथने जल्लोष केला. मात्र भज्जीला हे काही पटलं नाही.

या सामन्यात अमीश साहेबा अंपायर होते. श्रीसंथ मुंबईच्या प्रत्येक खेळाडूला डिवचत होता. हा सर्व प्रकार फिल्ड अंपायरला लक्षात आला. श्रीसंतला 2 वेळा सूचना देण्यात आली. मात्र त्यानंतरही श्रीसंतने उद्दामपणा सुरु ठेवला. मुंबईकडून मुसाविर खोटे नवव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी मैदानात आला. खोटे श्रीसंथच्या बॉलिंगवर हीट विकेट झाला. खोटे बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. यावेळस श्रीसंथने खोटेला डिवचलं. मुंबईचा 66 धावांनी पराभव झाला. यासह मुंबईने पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली.  

सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हस्तांदोलनसाठी मैदानात आले. यावेळेस पंजाबची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा आपल्या खेळाडूंचं अभिनंदन करत होती. हात मिळवण्यासाठी श्रीसंथ आणि हरभजन समोरासमोर आले. मुंबईचा पराभव झाल्याने आधीच हरभजन संतापलेला. त्यात श्रीसंथने भर घातली. श्रीसंथ हरभजनसोबत हस्तांदोलन करताना ‘हार्ड लक भज्जू पा’ म्हणाला.  

हरभजनचा पारा चढला. हरभजनने मागे पुढे न पाहता श्रीसंथला कानफाटीत लावून दिली. पंजाब मोहालीत जिंकल्याने संपूर्ण मैदानात आनंदाचं वातावरण होतं. तर दुसऱ्या बाजूला श्रीसंथ ढसाढसा रडू लागला.
मैदानातील जायंट स्क्रीनवर श्रीसंथचा रडतानाचा चेहरा पाहायला मिळाला. व्हीआरवी सिंह आणि गोयल ढांढस श्रीसंथला धीर देत होते. 

घडलेला प्रकार लक्षात येताच प्रीती झिंटाही श्रीसंथच्या दिशेने गेली. भर मैदानात पंजाबचे सर्व खेळाडू श्रीसंथला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र याचा काडीमात्र फरक श्रीसंथवर झाला नाही. नक्की काय झालंय आणि श्रीसंथला शांत कसं करावं, हे कोणालाच काही सुचत नव्हतं. थोड्या वेळात नक्की काय घडलं याबाबत समजलं. संपूर्ण मीडियामध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली. जी आयपीएल स्पर्धा रंगतदार सामन्यांमुळे काही दिवसांतच चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. या वादामुळे याच स्पर्धेला काळिमा फासली गेली.