केपटाऊन: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये हार्दिक पांड्याने जबरदस्त फटकेबाजी केली. हार्दिक पांड्याने केलेल्या या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला काही प्रमाणात सावरण्यास मदत झाली.
टीम इंडियाचा सातवा विकेट गेला त्यावेळी टीमचा स्कोअर केवळ ९२ रन्स होता. त्यामुळे टीम इंडिया मोठा स्कोअर करु शकणार नाही असचं चित्र दिसत होतं. मात्र, हार्दिक पांड्याने आपल्या जबरदस्त इनिंगमुळे टीम इंडियाला सावरलं.
हार्दिक पांड्याने मैदानात उतरल्यापासूनच फटकेबाजी केली आणि टीमला सावरलं. एक-एक रन करुन हार्दिकने ९३ रन्सची खेळी खेळली.
हार्दिक पांड्याने केवळ ४६ बॉल्समध्ये आपले ५० रन्स पूर्ण केले. या दरम्यान हार्दिक पांड्याने १३ फोर आणि १ सिक्सर लगावला. दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर भारताकडून सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पांड्या पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेत टेस्ट मॅचेसमध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी लगावण्याचा रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने सेंच्युरियन मैदानात २०१० मध्ये ४० बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली होती. दुसऱ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग असून त्याने २०१० मध्ये ४६ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली. त्यानंतर आता २०१८ मध्ये हार्दिक पांड्याने ४६ बॉल्समध्ये ५० रन्स केले.