विशाखापट्ट्णम : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या २ टी-२० मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. पहिली मॅच ही विशाखापट्टणम येथे भारतीय वेळेनुसार ७ वाजता सुरु होणार आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला या सीरिजला मुकावे लागणार आहे. तसेच ही टी-२० आणि वनडे सीरिज आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्तवपूर्ण असणार आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीने या सीरिजकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. या सीरिजमधील कामगिरीनुसार खेळाडूंना वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये स्थान मिळू शकते. त्यामुळे या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रत्येक भारतीय खेळाडूचा मानस असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी-२० मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधील अखेरच्या दोन मॅच आणि टी-२० सीरिजसाठी कोहलीला बीसीसीआयने विश्रांती दिली होती. यानंतर मायदेशात होत असलेल्या टी-२० आणि वनडे सीरिजमधून कोहली संघात पुनरागमन करत आहे. पहिल्या टी-२० मॅचमध्ये कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५०० रनचा टप्प्यापासून अवघ्या १२ रनांनी दूर आहे. कोहलीने टी-२० कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८८ रन केल्या आहेत. आज होणाऱ्या सामन्यात जर कोहलीने १२ रन केल्या तर त्याच्या नावे रेकॉर्ड होईल. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धात ५०० रन पूर्ण करणारा तो पहिलाच बॅट्समन ठरेल. क्रिकेट विश्वात अजूनही टी-२० मध्ये कोणालाही ऑस्ट्रेलिया विरोधात ५०० रन करता आलेल्या नाहीत.
बुमराहलादेखील या टी-२० मॅचमध्ये आपल्या टी-२० कारकिर्दीतील ५० विकेटचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. ५० विकेटपासून बुमराह केवळ २ विकेट दूर आहे. जर बुमराहने २ विकेट घेण्याची कामगिरी केली तर, असं करणारा तो दुसराच भारतीय बॉलर ठरेल. भारताकडून टी-२० मध्ये ५० विकेट घेण्याची कामगिरी सर्वात प्रथम फिरकीपटू आर आश्विन याने केली होती. अश्विनने ४६ मॅचमध्ये ५० विकेट घेतल्या आहेत. बुमराहच्या नावे आतापर्यंत ४८ विकेट्स आहेत. ४८ विकेट घेण्याची ही कामगिरी त्याने ४० मॅचमध्ये केली आहे.