INDvsAUS: मेलबर्न पराभवाच्या ३ तासांमध्ये ऑस्ट्रेलियन टीममध्ये बदल

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १३७ रननी पराभव झाला आहे.

Updated: Dec 30, 2018, 05:58 PM IST
INDvsAUS: मेलबर्न पराभवाच्या ३ तासांमध्ये ऑस्ट्रेलियन टीममध्ये बदल title=

मेलबर्न : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १३७ रननी पराभव झाला आहे. यामुळे ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं २-१नं आघाडी घेतली आहे. या पराभवाच्या ३ तासांमध्येच ऑस्ट्रेलियानं त्यांच्या टीममध्ये बदल केला आहे. सिडनीमध्ये होणाऱ्या चौथ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियानं ऑलराऊंडर मार्नस लाबसचग्ने याची टीममध्ये निवड केली आहे. चौथ्या टेस्टमध्ये लाबसचग्नेला मिचेल मार्शऐवजी टीममध्ये स्थान मिळू शकतं. तिसऱ्या टेस्टमध्ये मार्शला चांगली कामगिरी करता आली नाही. मार्शनं मेलबर्न टेस्टच्या २ इनिंगमध्ये १९ रनच केल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही.

मेलबर्नमधली तिसरी टेस्ट गमावल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला सीरिज वाचवण्यासाठी सिडनीमधली टेस्ट जिंकणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियानं या टेस्टमध्ये खराब बॅटिंग केल्याचं कर्णधार टीम पेन म्हणाला होता. टीम पेनच्याच मागणीमुळे मार्नस लाबसचग्नेची टीममध्ये निवड झाल्याचं बोललं जात आहे.

पाकिस्तानविरुद्ध युएईमध्ये झालेल्या मॅचमधून लाबसचग्नेनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पाकिस्तानविरुद्ध लाबसचग्नेनं चांगली कामगिरी केली होती. लाबसचग्नेनं टेस्ट कारकिर्दीतल्या २ मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आहेत, तर ८१ रनही केल्या आहेत.

पराभवावर टीम पेनची प्रतिक्रिया

पुढचे २ दिवस आम्हाला अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार आहे. मी माझे विचार प्रशिक्षक जस्टीन लँगर आणि खेळाडूंसमोर मांडीन, अशी प्रतिक्रिया टीम पेननं दिली आहे. लाबसचग्नेची टीममध्ये निवड झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये १५ खेळाडू झाले आहेत. टीम पेनला जास्तीत जास्त पर्याय द्यायचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे.

चौथ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाची टीम

टीम पेन, मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, मार्नस लाबसचग्ने, मिचेल मार्श, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, पीटर सीडल, क्रिस ट्रेमन