मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधील शेवटची वनडे दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात १३ मार्चला खेळली जाणार आहे. याआधी झालेल्या चार मॅचमध्ये उभय टीमने प्रत्येकी २ मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे सीरिज २-२ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे उद्या होणारी मॅच निर्णायक ठरणार आहे. जर या मॅचमध्ये भारतीय टीम पराभूत झाली तर तब्बल ४ वर्षांनी मायदेशात सीरिज गमावण्याची नामुश्की ओढावेल.
भारताने या आधी २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेली ५ मॅचची सीरिज ३-२ च्या फरकाने गमावली होती. यानंतर आतापर्यंत भारतात ६ वनडे सीरिजचे आयोजन करण्यात आले. या ६ सीरिजमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेली ही ७वी सीरिज आहे. या सीरिजचा निर्णय उद्याच्या अखेरच्या मॅचने लागणार आहे.
आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या पाच वनडे सीरिजला ११ ऑक्टोबर २०१५ पासून सुरुवात झाली होती. या सीरिजमधल्या चार वनडेतील पहिली, तिसरी आणि अखेरची पाचवी मॅच दक्षिण आफ्रिकने जिंकली होती. तर भारताने दुसरी आणि चौथी मॅच जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या मॅचमध्ये भारताचा तब्बल २१४ रनने पराभव झाला होता.
एक नजर २०१५ पासून झालेल्या सीरिजमध्ये भारताने केलेली कामगिरी पाहुयात.
१ ) न्यूझीलंडचा भारत दौरा २०१६
मायदेशात सीरिज गमावल्यानंतर भारतीय टीम पहिल्यांदाच न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज खेळली गेली. न्यूझीलंड टीम ५ वनडेसाठी भारत दौऱ्यावर आली होती. ही सीरिज १६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०१६ दरम्यान चालली होती. या सीरिजमधील दुसऱ्या आणि चौथ्या मॅचचा अपवाद वगळता भारताने उर्वरित मॅच जिंकून ३-२ च्या फरकाने सीरिज जिंकली होती.
२) या सीरिजनंतर जानेवारी २०१७ ला इंग्लंड टीम ३ वनडेसाठी भारत दौऱ्यावर आली होती. ही सीरिज भारताने २-१ च्या अंतराने जिंकली होती.
३) यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम ५ वनडे साठी भारतात दाखल झाली होती. ही सीरिज १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०१७ दरम्यान खेळली गेली होती. ही सीरिज भारताने ४-१ च्या फरकाने जिंकली होती.
४) ऑक्टोबर २२ ते २९ २०१७ या दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध ३ मॅचचे आयोजन करण्यात आले. ही ३ मॅचची सीरिज भारताने २-१ ने जिंकली.
५) २०१७ च्या अखेरीस श्रीलंका भारत दौऱ्यावर आली होती. ही ३ वनडे मॅचची सीरिज होती. ही सीरिज भारताने २-१ ने जिंकली. पहिल्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर भारतानं उरलेल्या दोन्ही वनडे जिंकल्या.
६) वेस्टइंडिजची टीम मागच्यावर्षी ५ वनडे मॅचसाठी भारत दौऱ्यावर आली दाखल झाली होती. ही सीरिज भारताने ३-१ च्या अंतराने जिंकली होती. या सीरिजमधली पहिली मॅच भारताने, दुसरी मॅच वेस्ट इंडिजने, तिसरी मॅच भारताने जिंकली. यानंतर झालेली चौथी मॅच टाय झाली, तर पाचव्या मॅचमध्ये पुन्हा भारताचा विजय झाला.