रांची : भारताविरोधात पहिल्या टी-२० क्रिकेट मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. कारण, प्रॅक्टीस दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जखमी झाला आहे.
प्रॅक्टीस करत असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्याने स्मिथला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.
रुग्णालयात स्टिव्ह स्मिथचं एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी स्मिथ फिट असल्याचं घोषित करण्यात आलं आणि मॅच खेळण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, स्मिथ खेळणार की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये.
वन-डे मॅचेसमध्ये ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखीन वाढला आहे. त्यामुळे टीम इंडिया त्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. तर, भारताचा पराभव करण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन टीम मैदानात उतरणार आहे.
यापूर्वी झालेल्या वन-डे सीरिजमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ४-१ ने पराभव केला होता. ऑस्ट्रेलियन टीमने केवळ एकच मॅच बंगळुरुत जिंकली होती. ही सीरिज जिंकताच टीम इंडिया वन-डे रॅकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर दाखल झाली. तर, ऑस्ट्रेलियन टीम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली.
रांचीमध्ये शनिवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मॅच होणार आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रांचीमध्ये पाऊस पडत असल्याने या मॅचवर पावसाचं सावट आहे. सलग दोन दिवस पाऊस कोसळत असल्याने टीम इंडियाला मैदानात प्रॅक्टीस करता आला नाही आणि त्यामुळे त्यांनी इनडोअर प्रॅक्टीस केली.