मुंबई : टीम इंडिया नुकतीच साऊथ आफ्रिका दौ-यासाठी रवाना झाली असून या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियातील खेळाडूंचा फॉर्म पाहता टीम इंडियाकडून अनेक अपेक्षा आहेत. पण सामने सुरू होण्याआधी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे.
सलामी फलंदाज शिखर धवन याला टाचेला दुखापत झाल्याने साऊथ आफ्रिके विरूद्ध पाच जानेवारीला सुरू होणा-या पहिल्या टेस्ट सामन्यात खेळू शकेल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. टीम इंडिया रवाना होत असताना धवन हॉटेलमध्ये प्रवेश करताना लंगडताना दिसता. त्याच्या डाव्या टाचेवर पट्ट्य़ा बांधलेल्या दिसल्या. त्याच्यासोबत फिजिओ पॅट्रीक फरहार्ट हे सुद्धा होते आणि त्याचं एमआरआय स्कॅनही करण्यात आलं.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर खुलासा केला की, ‘शिखर धवनच्या टाचेच्या जखमेची तपासणी केली गेली. फिजिओने राष्ट्रीय निवड समितीलाही याचा रिपोर्ट सादर केला आहे’.
सध्यातरी तो टीमसोबत दौ-यावर जात आहे. पण हे नक्की नाहीये की, तो पहिल्या टेस्ट सामन्यात खेळेल अथवा नाही. जर धवन पहिल्या टेस्टसाठी अनफिट ठरल्यास त्याच्या जागी केएल राहुलला मुरली विजयसोबत सलामीला पाठवले जाऊ शकते.