मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय टीम आणि कोच अनिल कुंबळेमध्ये वाद असल्याचं बोललं जातंय. ड्रेसिंग रूममध्ये कुंबळेकडून स्वातंत्र्य मिळत नाही तसंच कुंबळे खेळाडूंशी उद्दामपणे वागत असल्याची खेळाडूंची तक्रार असल्याची बातमी इंडिया टूडेनं दिली आहे.
भारतीय खेळाडूंनी कुंबळेच्या या वर्तणुकीबद्दल बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचंही बोललं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळेचा करार संपतो आहे. त्यामुळे नव्या कोचची नियुक्ती करण्यासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत.
दरम्यान खेळाडूंबरोबरच बीसीसीआयही कुंबळेच्या वर्तणुकीबाबत नाराज असल्याचं समजतंय. भारतीय क्रिकेटपटू आणि कोचच्या पगारामध्ये वाढ करण्याची मागणी कुंबळेनं बीसीसीआयकडे केली होती.
याचबरोबर काही दिवसांपूर्वी भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार का नाही याबद्दल साशंकता असताना कुंबळेनं भारतीय खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची इच्छा असल्याचं वक्तव्य केलं होतं. कुंबळेचं हे वक्तव्यमुळेही बीसीसीआय नाराज झाल्याची माहिती आहे.
या सगळ्या वादामुळे आता अनिल कुंबळेची कोच म्हणून नियुक्ती होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती बीसीसीआयकडे आलेल्या इच्छुकांच्या यादीतून भारताच्या नव्या कोचची निवड करणार आहेत.