भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup) निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुन्हा यु-टर्न घेण्याचा आपला कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं रोहित शर्मा म्हणाला आहे. तीन महिन्यांपूर्वी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसंच निवृत्ती शब्दाने जागतिक क्रिकेटमध्ये आपलं महत्व आणि सत्यता गमावली असल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे. शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक यांच्यासह जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतल्यानंतर माघार घेतली होती. मायकल जॉर्डन, मायकेल फेल्प्स, किम क्लिस्टर्स, टॉम ब्रॅडी यांसारख्या नामवंत खेळाडूंनीही यापूर्वी आपली निवृत्ती गांभीर्याने घेतली नाही.
पण रोहित शर्मा आपला निर्णय बदलणार नाही यावर ठाम आहे. याचं कारण रोहित शर्मा निर्णयाच्या वेळेबाबत समाधानी आहे. अनेकांना आपल्या अटींवर बाहेर जाण्याची संधी मिळत नाही जी रोहित शर्माला मिळाली आहे. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी 2014 मध्ये असंच केलं होतं. तसंच मायकेल क्लार्कने 2015 च्या विश्वचषकात केलं होते. परंतु विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वोच्च स्थानावर असताना निवृत्ती जाहीर करण्याची संधी अनेकांना मिळत नाही. संपूर्ण भारत टी-20 वर्ल्डकपचा विजय साजरा करत असताना रोहित शर्माने शांतपणे निवृत्ती जाहीर करत बॉम्ब टाकला.
"जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्तीची कल्पना म्हणजे मस्करीचा भाग झाला आहे. कोणीतरी निवृत्ती जाहीर करतं आणि पुन्हा खेळण्यासाठी येतात. हे भारतात झालेलं नाही, पण काही आंतरराष्ट्रीय खेळाडू निवृत्ती जाहीर केल्यानंतर निर्णय मागे घेताना दिसतात. त्यामुळे तो खेळाडू खरंच निवृत्त झाला आहे की नाही हे समजत नाही. मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे. मी माझ्या निर्णयबाबत स्पष्ट आणि अंतिम आहे," असं रोहित शर्माने जिओ सिनेमावर बोलताना सांगितलं. रोहित शर्माने सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून आपल्या T20I कारकिर्दीचा शेवट केला. त्याने 140 च्या स्ट्राइक-रेटने 159 सामन्यांतून 4231 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेत भारताच्या ऐतिहासिक 2007 T20 विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने 2024 चा टी-20 वर्ल्डकप जिंकत एक वर्तुळ पूर्ण केलं. निवृत्ती जाहीर कऱण्यासाठी यापेक्षा चांगला क्षण रोहितला मिळाला नसता. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली परतणार नाही असं वाटत होतं. पण ते परतले आणि जबरदस्त कामगिरी केली.
घरच्या मैदानावर 2023 चा विश्वचषक थोडक्यात हुकल्यानंतर रोहितने शेवटच्या वेळी T20I मध्ये आपले नशीब आजमावले. रोहितने T20 विश्वचषकात 257 धावांसह भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 92 धावांच्या सर्वोत्तम खेळींचा समावेश आहे. ही या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी होती.
"तोच तो क्षण होता. मला खेळायला आवडणाऱ्या फॉरमॅटला निरोप देण्याची हीच योग्य वेळ होती. मी भारताकडून वनडेमध्ये पदार्पण केले होते, पण तेथून लगेचच 2007 मध्ये टी-20 विश्वचषक खेळलो. मी तो जिंकला आणि आता मी जिंकलो आहे. त्यामुळे आता पुढे जाण्याी ही चांगली वेळ आहे," असं तो पुढे म्हणाला.