मुंबई : कोणत्याही क्षेत्रात अमुक एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यावरच अनेकजण भर देतात. ही वाट काहींसाठी सुकर असते. पण, काहींना मात्र बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. ही आव्हानं अशी असतात ज्यातून काहींना तर बाहेर पडणंही निव्वळ अशक्य वाटू लागतं. याच दरम्यान नैराश्य बळावतं आणि परिस्थितीची उकल होण्याआधीच सारंकाही हातचं निसटलेलं असतं.
नैराश्याच्या अशाच परिस्थितीचा सामना भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू प्रवीण कुमार यानेही केला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपण जीवन संपवण्याचा विचार केल्याचाही धक्कादायक खुलासा केला.
जलद आणि मध्यम गतीच्या गोलंदाजीने विरोधी संघातील खेळाडूंना त्रिफळाचीत करणाऱ्या प्रवीण कुमार याच्या डोक्यात एकेकाळी आयुष्यच संपवण्याचेही विचार आले होते. काही महिन्यांपूर्वी मेरठमध्ये एके दिवशी अगदीच पहाटेच्या सुमारास कुटुंबीय झोपलेले असताना मफलर गुंडाळून, हाताशी रिव्हॉल्वर घेऊन प्रवीण त्याच्या कारमध्ये बसला. हरिद्वारच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्या कारने वेग पकडला.
तो कारमध्ये बसला होता, त्याच्याच शेजारी रिव्हॉल्वर ठेवलेलं होतं. 'हे सारं काय सुरु आहे..., बस्स आता सर्व संपवलं पाहिजे', याच विचाराने त्याच्या मनात घर केलं. याचविषयी सांगताना पुढे प्रवीण म्हणाला, 'असे विचार माझ्या मनात येताच, मी माझ्या मुलांसोबत असं चुकीचं वागू शकत नाही. त्यांना मी नरकयातना देऊच शकत नाही. बस्स मी पुन्हा मागे फिरलो.'
प्रवीण कुमारने रितसरपणे त्याच्या नैराश्यावर उपचार घेतले आणि तो यातून सावरला. २०१४ला जेव्हा भारतीय क्रिकेट संघातून त्याला वगळण्यात आलं, आयपीएलमध्येही अशीच काहीशी परिस्थिती होती तेव्हाच प्रवीण कुमारच्या क्रिकेट कारकिर्दीची अखेर झाल्याचे संकेत मिळाले होते.
प्रवीण कुमारच्या बदललेल्या या वक्तव्याची कुटुंबीयांनाही अनुभूती होती. काहीतरी बिनसलं आहे याची त्यांना जाणीव होती. पण, यावर प्रवीणने मात्र व्यक्त होणं बंद केलं होतं. यामागे एक कारण सांगितलं जातं ती त्याला नेमकं काय होत आहे हेच कळत नव्हतं. यावरच त्याने इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत सुचक वक्तव्य केलं. 'भारतात डिप्रेशन ही संकल्पनाच कुठे आहे. याविषयी तर, कोणालाही काही ठाऊक नाही. मेरठमध्येही नाही. किमान सध्यातरी काहीच माहिती नाही', असं तो म्हणाला.
आपल्या मनात सुरु असणारे विचार काही केल्या थांबत नसल्याचं प्रवीण कुमारने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितलं होतं. एकाएकी प्रसिद्धीझोतापासून दूर होण्याचाही हा परिणाम होता. ड्रेसिंग रुममधील वातावरण, मोठ्या संख्येवर क्रीडारसिकांपुढे आपल्या खेळाचं सादरीकरण करणं या साऱ्याची कमतरता अर्थात त्याला जाणवत होती. पण, या साऱ्यात क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याची भावना त्याला एक आशेचा किरण देत होती.
भारतीय संघासाठी प्रवीण जवळपास आठ वर्षांहून अधिक काळापूर्वी खेळला होता. नव्या जोमाच्या खेळाडूंनी ज्या वेगाने संघात कायमचं स्थान मिळवलं त्याच वेगाने प्रवीणचा विसरही अनेकांना पडला होता. अर्थात याची सल त्याच्या मनात असेलही. पण, एकटेपणा आणि रितेपणाचं पारडं इतकं जड होतं, की प्रवीण त्यात गुरफटला गेला. प्रसिद्धीझोतात असणापारा आणि दमदार खेळाच्या बळावर क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूने त्याच्या खासगी आयुष्यातील या महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक प्रसंगांविषयी केलेला खुलासा अनेकांना धक्का देणारा ठरत आहे.