मुंबई : भारतीय क्रिकेट संघात सध्याच्या घडीला एक वादळ आल्याचं कळत आहे. वर्ल्ड टी२०च्या अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी संधी न दिल्याच्या मुद्द्यावरुन एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच प्रकरणी मिताली राज हिने महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी असणाऱ्या रमेश पोवार यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
पोवार यांनी आपला अपमान केल्याचा आरोप तिने केला आहे. बीसीसीआयला एका पत्राद्वारे तिने याविषयीची माहिती दिली.
'हरमनप्रीत कौर हिच्याशी माझा काहीच वाद नाही. पण, ती रमेश पोवार यांच्या निर्णयाच्या बाजूने होती. मला प्लेइंग इलेव्हनमध्ये न निवडण्याच्या पोवार यांच्या निर्णयाचं तिने समर्थन केलं होतं. देशासाठी विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहात होते. पण, एक सुवर्णसंधी गमावल्याचं मला फार दु:ख आहे', असं ती या पत्रात म्हणाली.
पोवार आणि सीओए सदस्य इडुलजी यांनी आपल्याला हेतुपूर्वक संघातून वगळलं, असं म्हणत तिने हे आरोप केले आहेत. मुख्य म्हणजे हे आरोप करत आपण एक प्रकारचं संकट ओढवून घेत असल्याची कल्पना आहे, असं म्हणत मितालीने अपेक्षित संकटांची कल्पना असल्याचंही स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाला आता पुढे नेमकं कोणतं वळण मिळणार आणि मितालीने केलेल्या आरोपांवर पोवार, हरमनप्रीत कौर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.