मेलबर्न : भारतीय क्रिकेट विश्वासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातही आपला ठसा उमटवणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आलेल्या या दशकातील एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी त्याचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडूनच याविषयीची घोषणा करण्यात आली. त्यांनी जाहीर केलेल्या या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
महेंद्रसिंह धोनीव्यतिरिक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही या एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान मिळालं आहे. 'दहा वर्षांमधील नंतरचा काही काळ त्याच्या फलंदाजीची फारशी जादू पाहता आली नसली तरीही भारतीय क्रिकेटमधील सुवर्णकाळामध्ये त्यातही एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा विशेष अफलातून अंदाज पाहाला मिळाला. २०११मध्ये मायदेशी झालेल्या विश्वचषक सामन्यांमधील त्याचं योगदान पाहता फलंदाजीच्या बाबतीत तो भारतीय संघासाठी सामना निकाली काढणाराच खेळाडू ठरला', असं धोनीची प्रशंसा करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आलं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून फक्त धोनीच्या फलंदाजीचीच नव्हे, तर त्याच्या यष्टीरक्षणाचीही प्रशंसा करण्यात आली. ३८ वर्षीय धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये क्रिकेट विश्वचषकानंतर त्याने काही वेळ स्वत:ला दिल्याचं पाहायला मिळत आहे. विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या अपयशी फलंदाजीवर अनेकांनी टीका केल्या होत्या. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांविरोधातही धोनीच्या खेळीवर अनेकांनी टीका केली होती. शिवाय संघाच्या पराभवासाठी त्याच्यावर अनेकांनीच टीकेची झोड उठवली. एकिकडे धोनीवर टीका केली जात असतानाच त्याचा या खेळामध्ये असणारा त्याचा वावर हा कायमच त्याला खास ठरवत आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या दशकातील एकदिवसीय संघात 'या' खेळाडूंना स्थान
रोहित शर्मा, हाशिम आमला, विराट कोहली, ए बी डीव्हिलियर्स, शाकिब अल हसन, जॉस बटलर, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा, राशिद खान यांचा या संघात समावेश आहे.
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सुरुवातीच्या फळीचा फलंदाज शिखर धवन य़ांना या संघात स्थान मिळवता आलेलं नाही. पण, तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांला उल्लेख मात्र जरुर करण्यात आला आहे.
एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा धोनीवर सोपवलेली असतानाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विराट कोहलीला दशकातील कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
या संघात, ऍलेस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), ए बी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नाथन लिऑन आणि जेम्स ऍन्डरसन यांचा सामावेश आहे.