या भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी

सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे.

Updated: Apr 1, 2018, 04:47 PM IST
या भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी  title=

मुंबई : सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मैदानातल्या चुकीच्या वागण्यामुळे खेळाडूंचं निलंबन झालं आहे. ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर कॅमरून बँक्रॉफ्टच ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. भारतामध्येही अशाप्रकारे एका खेळाडूचं निलंबन करण्यात आलं आहे.

भारतीय खेळाडूंचं निलंबन

क्रिकट्रॅकर या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेटपटू अख्तर शेख याचं आयुष्यभरासाठी निलंबन करण्यात आलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या समितीनं अख्तर शेखवर ही कारवाई केली आहे.

अख्तर शेख खोटी ओळख देऊन २०१७ साली राजस्थानच्या राजवाडा क्रिकेट लीग मॅचमध्ये खेळला होता, असा आरोप आहे. अख्तर शेख आता मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)च्या कोणत्याही मॅच खेळू शकणार नाही. मुंबई लीगमध्ये अख्तर शेख मुंबई नॉर्थ पँथर्सकडून खेळणार होता. पण याप्रकरणाचा संशय एमसीएला लीग सुरु होताना म्हणजेच १५ मार्चलाच आला होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या लीगचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे तर सुनिल गावसकर मेंटर आहेत. या लीगच्या सगळ्या मॅच वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आल्या. अजिंक्य रहाणे, अभिषेक नायर, श्रेयस अय्यरसारखे खेळाडू या लीगमध्ये खेळले. ११ मार्च ते २१ मार्चपर्यंत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या लीगच्या मॅच खेळवण्यात आल्या.