West Indies Tour: तुमचा अख्खा संघ अपयशी ठरलाय, मग बळीचा बकरा....; भारतीय संघ निवडीवरुन गावसकर संतापले

West Indies Tour: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. पुजाराला संघात सहभागी न करुन घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही यावरुन निवडकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 24, 2023, 01:34 PM IST
West Indies Tour: तुमचा अख्खा संघ अपयशी ठरलाय, मग बळीचा बकरा....; भारतीय संघ निवडीवरुन गावसकर संतापले title=

West Indies Tour: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माकडेच या संघाचंही नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. दरम्यान 16 सदस्यांच्या संघात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) संधी देण्यात आलेली नाही. 35 वर्षीय पुजाराला संघात सहभागी न करुन घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही या निर्णयावर टीका केली असून निवडकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. 

चेतेश्वर पुजाराला 2022 दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संधी देण्यात आली नव्हती. पण काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा संघात परतला होता. 

सुनील गावसकर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हटलं की, "पुजाराला का हटवलं? इतर फलंदाजांच्या अपयशासाठी त्याला बळीचा बकरा का बनवलं जात आहे? तो भारतीय संघाचा एका विश्वासू आणि संयमी खेळाडू आहे. फरक इतकाच आहे की, त्याचे इतर खेळाडूंप्रमाणे लाखो फॉलोअर्स नाहीत जे त्याच्या बाजूने आरडाओरड करतील. हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा आणि इतरांना संधी देण्याचा नेमका मापदंड काय आहे? आजकाल निवडकर्ते प्रसारमाध्यमांशी काही बोलत नसल्याने मला याबद्दल काही माहिती नाही".

फक्त वयामुळे चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर बसवणं योग्य नाही असंही सुनील गावसकर म्हणाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलेल्या फलंदाजात चेतेश्वर पुजारा एकमेव नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. संघातील टॉप चार फलंदाज पहिल्या डावात फक्त 71 धावांवर बाद झाले होते. पुजाराने 14 आणि 27 धावा केल्या. पण चेतेश्वर एकमेक फलंदाज नव्हता ज्याला संघर्ष करावा लागला. 50 हून अधिक धावा करणारा अजिंक्य रहाणे एकमेव फलंदाज होता. 

"तो काऊंटी क्रिकेट खेळत आहे, याचा अर्थ त्याने रेड बॉल क्रिकेट फार खेळलं आहे. आज खेळाडू  39-40 वयापर्यंत क्रिकेट खेळू शकतात. वयाचा काही फरक पडतो असं मला वाटत नाही. अजिंक्य रहाणे वगळता संपूर्ण भारतीय संघ अपयशी ठरला. मग एकटया पुजाराला का जबाबदार धरलं जात आहे, हे निवडकर्त्यांना सांगावं लागेल," असं गावसकर म्हणाले आहेत.

पुजाराने गेल्या 28 कसोटी सामन्यात 26.69 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 11 अर्धशतकं केली. दरम्यान वेस्ट इंडिजविरोधात यशस्वी जैस्वाल पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास येऊ शकतो. 

कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जैसवाल, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल , मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.