India vs Australia: ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहली म्हणतोय....

त्याचा शब्द संघातील खेळाडूंनी पडू दिला नाही.

Updated: Jan 7, 2019, 10:25 AM IST
India vs Australia: ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहली म्हणतोय....  title=

सिडनी : India vs Australia बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये अखेर भारतीय क्रिकेट संघाने बाजी मारली आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी होती. ज्यानंतर चौथ्या आणि निर्णायक सामन्यातही विजयी पताका उंचावू, असा निर्धार विराट कोहलीने व्यक्त केला होता. त्याचा शब्दही संघातील खेळाडूंनी पडू दिला नाही. 

निर्णायक अशा चौथ्या कसोटी सामन्याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलेलं असताना पावसामुळे आलेल्या अडचणी टाळत हा सामना अनिर्णितच घोषित करण्यात आला आणि भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झालं. या निर्णयानंतर सिडनीच्या क्रिकेट मैदानात भारतीय खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यासोबतच कर्णधार कोहलीची मान गर्वाने उंचावल्याचं पाहायला मिळालं. 

नेहमीच संघातील प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी उभं राहत त्याला प्रोत्साहित करणाऱ्या विराटने यावेळीही एक कर्णधार म्हणून प्रशंसनीय जबाबदारी पार पाडली. सामना जिंकल्यानंतरच्या बक्षीस वितरण सोहळ्यावेळी आणि पत्रकार परिषदेवेळी त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

'याहून जास्त गर्वाचा क्षण माझ्या आयुष्यात कधी आलाच नव्हता. या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही फारच गर्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे. कारण संघातील खेळाडूंमुळेच आज कर्णधार म्हणून माझी मान गर्वाने उंचावली आहे. हा विजय सर्वस्वी महत्त्वाचा आहे', असं विराट म्हणाला. 

२०११ चा विश्वचषक ज्यावेळी भारतीय संघाने जिंकला होता, तेव्हा मी संघातील एक युवा केळाडू होतो असं म्हणत त्यावेळी इतरांना भावूक झालेलं मी पाहिलं खरं, पण मी स्वत: भावूक झालो नव्हतो असं त्याने स्पष्टकेलं पण, हा क्षण मात्र भावनिक करणारा असल्याची बाब त्याने अधोरेखित केली. चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल  आणि संघातील सर्व खेळाडूंच्या कामगिरीची त्याने प्रशंसा केली. त्याशिवाय गोलंदाजांचंही विराटने विशेष कौतुक केलं. गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाजांची कामगिरी पाहता अनेक वेगवान गोलंदाचांचा विक्रम मोडण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला.