'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने रोहित शर्माबदद्दल एक खुलासा केला आहे. त्याने याआधी न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 13, 2024, 11:24 AM IST
'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा title=

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने (Piyush Chawla) कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) आतापर्यंत न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे. पियूष चावला डिसेंबर 2012 मध्ये भारतासाठी अखेरचा खेळला होता. पियूष चावलाने रोहित शर्मासह आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल अशा दोन्ही स्तरावर क्रिकेट खेळलं आहे. पियूष चावला भारताच्या 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 एकदिवसीय वर्ल्डकप विजेत्या संघाचा भागही होता. त्यावेळी रोहित शर्माही संघात होता. 2023 मध्ये पियूष चावला रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघातून खेळला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पियूष चावलाने रोहित शर्मा मैदानाबाहेर असतानाही कर्णधार म्हणून सक्रीय असतो असा खुलासा केला. 

"मी त्याच्यासह इतकं क्रिकेट खेळलो आहे की, आता आम्ही एक सहजतेच्या स्थितीत पोहोचलो आहोत. आम्ही मैदानाबाहेरही एकत्र बसलेलो असतो. एकदा रात्री 2.30 वाजता त्याने मला मेसेज करुन 'जागा आहेस का?' असं विचारलं. त्याने पेपरवर क्षेत्ररक्षणाची योजना आखली होती. वॉर्नरला बाद कसं करु शकतो याच्या शक्यतांची त्याने माझ्याशी चर्चा केली. त्यावेळीही तो माझ्याकडून सर्वोत्तम कसं काढता येईल याचा विचार करत होता,"असं पियूष चावलाने शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"एक असतो कर्णधार आणि एक असतं नेतृत्व. तो कर्णधार नसून, नेतृत्व करणारा आहे. मग तो 2023 चा एकदिवसीय वर्ल्डकप असो किंवा मग 2024 चा टी-20 वर्ल्डकप असो. ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली, त्यामुळे इतर फलंदाजांसाठी एक चांगला टोन तयार झाला आणि त्यांना फलंदाजी करणं सोपं झालं. तो एक खरं नेतृत्व आहे. तो तुम्हाला मोकळ्या हाताने खेळण्याची संधी देतो," असं कौतुक पियूष चावलाने केलं.

विराट कोहली कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर भारताचे कर्णधारपद स्वीकारणाऱ्या रोहित शर्माने भारताला T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद मिळवून दिले. या विजयानंतर, रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून सक्रिय आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जनेही पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. IPL 2024 च्या अगोदर, MI ने रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. यावरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.