INDvsENG: इंग्लंडविरुद्धच्या टी-२०साठी भारतीय महिला टीमची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० साठी भारतीय महिला टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Feb 26, 2019, 02:17 PM IST
INDvsENG: इंग्लंडविरुद्धच्या टी-२०साठी भारतीय महिला टीमची घोषणा title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० साठी भारतीय महिला टीमची घोषणा करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या टी-२० सीरिजसाठी स्मृती मंधानाकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापत झालेली हरमनप्रीत कौर टी-२० सीरिजला मुकणार आहे. २२ वर्षांच्या स्मृती मंधानानं आत्तापर्यंत ५५ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळल्या आहेत. यामध्ये तिने १,२२६ रन केले आहेत. स्मृतीनं याशिवाय ५० वनडे मॅच आणि २ टेस्ट मॅचही खेळल्या आहेत.

भारत आणि इंग्लंडमधला पहिला टी-२० सामना ४ मार्चला खेळवण्यात येईल. दुसरी मॅच ७ मार्च आणि शेवटची टी-२० मॅच ९ मार्चला होईल. या सीरिजच्या सगळ्या मॅच या गुवाहाटीमध्ये खेळवण्यात येतील.

न्यूझीलंडमधून परतलेल्या भारतीय महिला टी-२० टीममध्ये ४ बदल करण्यात आले आहेत. दुखापत झालेली हरमनप्रीत कौर, डी. हेमलता, मानसी जोशी आणि प्रिया पूनिया यांना स्थान मिळालं नाही. यांच्याऐवजी वेदा कृष्णमूर्ती, कोमल जनजाद, भारती फुलमाली आणि हरलीन देओल यांची टीममध्ये निवड झाली आहे.

सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये वनडे सीरिज सुरू आहे. सोमवारी भारतानं दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवून सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली. तिसरी मॅच २८ फेब्रुवारीला मुंबईत खेळवली जाईल.

भारतीय टीम : स्मृती मंधाना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया (विकेटकीपर), भारती फुलमाली, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल जनजाद, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल