दुसऱ्या वनडेतही कांगारूंचं लोटांगण, कुलदीपची हॅट्रिक

दुसऱ्या वनडेमध्येही भारतानं कांगारूंना लोळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार ठरले ते भारतीय बॉलर्स. 

Updated: Sep 21, 2017, 10:02 PM IST
दुसऱ्या वनडेतही कांगारूंचं लोटांगण, कुलदीपची हॅट्रिक title=

कोलकाता : दुसऱ्या वनडेमध्येही भारतानं कांगारूंना लोळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार ठरले ते भारतीय बॉलर्स. २५३ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २०२ रन्सवर ऑल आऊट झाला आणि भारताचा ५० रन्सनी विजय झाला. भारताच्या कुलदीप यादवनं हॅट्रिक घेतली तर भुवनेश्वर कुमारला तीन विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि युझुवेंद्र चहालला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.

३२ व्या ओव्हरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलला कुलदीपनं ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही बॅट्समनना तंबूचा रस्ता दाखवला. हॅट्रिक घेताना कुलदीपनं मॅथ्यू वेड, अॅश्टन अगर आणि पॅट कमिन्स यांचा बळी घेतला.

भारताकडून हॅट्रिक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा खेळाडू बनला आहे. याआधी चेतन शर्मानं १९८७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तर कपील देवनं श्रीलंकेविरुद्ध १९९१मध्ये हॅट्रिक घेतली होती.

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानातल्या या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि २५२ रन्सपर्यंत मजल मारली. ओपनिंगसाठी मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणेने ६४ बॉल्समध्ये ५५ रन्स केले. मात्र, रोहित शर्माला चांगली बॅटिंग करण्यात अपयश आलं आणि तो केवळ ७ रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला चांगली साध दिली.

विराट कोहलीने १०७ बॉल्समध्ये ९२ रन्स केले ज्यामध्ये ८ फोरचा समावेश आहे. पण त्यानंतर एकाही बॅट्समनला मोठा स्कोर उभारता आला नाही. अखेर टीम इंडियाने ५० ओव्हर्समध्ये २५२ रन्स केले.