तिरुवनंतरपुरम : तिरुवनंतपुरुममध्ये भारत आणि विंडीजमधील पाचवा एकदिवसीय सामना रंगणार आहे. भारतानं पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ नं आघाडी घेतलीय. कोहलीचा संघ आणखी एक मालिका विजय साकारण्यासाठी सज्ज असेल... तर विंडीजचा संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरेल.
भारतीय संघ मायदेशात सलग सहाव्यांदा द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आतूर आहे. मुंबई एकदिवसीय सामना जिंकत भारतानं मालिकेत आघाडी घेतली. आता मालिका विजय मिळवण्यासाठी कोहलीचा संघ प्रयत्नशील असेल.
भारतानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर कॅरेबियन संघावर मात केली. पहिल्या तीन सामन्यात गोलंदाजांनी काहीशी निराशा केली होती.
मात्र, चौथ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांनी कामगिरी उंचावत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. त्यामुळे पाचव्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल.
कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच होतेय. कोहलीनं आत्तापर्यंत तीन तर रोहितनं दोन शतकं झळकावण्याची किमया साधली.
कॅरेबियन गोलंदाजांसमोर या दोघांनाही रोखण्याचं मोठं आव्हान आहे... तर अंबाती रायडूची बॅटही मुंबईत चांगलीच तळपली होती. मात्र, शिखर धवन आणि महेंद्रसिंग धोनीच्या फॉर्मची चिंता कर्णधार कोहलीला आहे. विंडीजनं भारताला कडवं आव्हान दिलंय.
मात्र, त्यांना भारतीय संघावर मात करता आलेली नाही. टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे तर कॅरेबियन संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल.