मुंबई : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच 27 ऑगस्टला आशिया कपचा पहिला सामना होणार आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होण्याची शक्यता आहे.
प्रथम साखळी टप्प्यात भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात सामना होईल, त्यानंतर दोन्ही संघ सुपर 4 मध्ये देखील आमने-सामने येऊ शकतात. इतकंच नाही तर आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत हे दोन संघ भिडण्याची शक्यता आहे.
तब्बल दहा महिन्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया कप 2022 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी साखळी सामना होणार आहे. या दोन संघांशिवाय आणखी एक संघ यासाठी पात्र ठरणार आहे. कोणताही संघ पात्र ठरू शकतो, परंतु भारत आणि पाकिस्तान त्यांच्या गटात अव्वल राहण्याची शक्यता आहे. असे झाले तर 4 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानची टक्कर पाहायला मिळू शकते.
दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पुन्हा शक्य आहे. म्हणजेच आशिया चषक स्पर्धेतील दोन सामने जवळपास निश्चित झाले असून तिसरा सामनाही होण्याची शक्यता आहे.
2021 च्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला भारताला अद्याप घेता आलेला नाही. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकही आयोजित केला जाणार आहे. तिथेही भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. सर्व काही ठीक राहिल्यास, 23 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडताना दिसू शकतात.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर पुन्हा एकदा स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे. त्यावेळी कोहली कर्णधार होता, पण आता भारताचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हाती आहे. येत्या काही महिन्यांत रोहित शर्मा विराट कोहलीच्या पराभवाचा बदला घेण्यास सक्षम असेल का, हे पाहणे मनोरंजक असेल.