भारत आणि इंग्लंडदरम्यान रांचीमध्ये चौथी कसोटी सामना खेळला जात आहे. दोन दिवसांचा खेळ संपला असून, सध्या दोन्ही बाजू भक्कम दिसत आहेत. हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान समालोचक आणि माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारताला विराट कोहलीची कमतरता जाणवत असल्याचं म्हटलं आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बीसीसीआयकडे विनंती करत पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती घेतली होती. पण यानंतर त्याने उर्वरित तीन सामन्यातही खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. इंग्लंडने सामन्यात वर्चस्व घेतलं असता संजय मांजरेकर यांनी मैदानात विराट कोहलीमध्ये असणाऱ्या ऊर्जैची उणीव भासत असल्याचं म्हटलं.
संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीकडे गर्दीला आपल्यामागे आणि भारतीय संघामागे खेचून आणण्याची एक शैली आहे असं सांगितलं. तसंच आपल्या आक्रमक शैलीने तो विरोधी संघासाठी आव्हान निर्माण करतो असं ते म्हणाले आहेत.
"विराट कोहली अशा खेळाडूंपैकी आहे, जो खेळाडू शांत असताना गर्दीला त्यांच्यासाठी चिअर करायला लावतो आणि ऊर्जा भरतो. तो मैदानात असताना तीव्रता कमी होणार नाही याची काळजी घेतो. भारताला विराट कोहलीची कमतरता जाणवत आहे. त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. त्याच्यात ऊर्जा भरलेली असते," असं संजय मांजरेकर म्हणाले आहेत.
यावेळी दिनेश कार्तिकही कॉमेंट्री बॉक्समध्ये होता. त्यानेही संजय मांजरेकरांच्या मताशी सहमती दर्शवली. गर्दीला आपल्यामागे खेचून आणण्याचं विशेष कौशल्य त्याच्याकडे आहे असं दिनेश कार्तिकने म्हटलं.
15 फेब्रुवारीला विराट कोहलीने पत्नी अनुष्काने मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी दिली. या मुलांच नाव अकाय ठेवण्यात आल्याचंही त्याने सांगितलं.
"अतिशय आनंदाने आणि आमच्या प्रेमाने भरलेल्या अंतःकरणासह, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे अकाय आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केलं. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम असतील अशी आशा. आम्ही तुम्हाला विनंती करतो की यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता," अशी पोस्ट त्याने शेअर केली होती.
विराट कोहली आयपीएलमध्ये परतण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना विराटच्या बंगळुरु संघाचा आहे. 22 मार्चला ते चेन्नईशी भिडणार आहेत. लोकसभा निवडणुका असल्याने सध्या फक्त 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.