IND VS ENG : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

IND vs ENG 2nd Test Day 4: टीम इंडियाने चेन्नई कसोटी क्रिकेटमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.  

Updated: Feb 16, 2021, 01:22 PM IST
IND VS ENG : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय  title=

मुंबई : IND vs ENG 2nd Test Day 4: टीम इंडियाने चेन्नई कसोटी क्रिकेटमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटीतील पराभवाचा बदला घेतला आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर 317 धावांनी विजय नोंदविला आहे. या कसोटीत अक्षर पटेल यांने 5 तर अश्विनने 3 बळी घेतले. टीम इंडियाने या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

टीम इंडियाने 317 धावांनी मोठा विजय नोंदवत चार सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी जिंकली आहे. या सामन्याच्या सुरूवातीपासूनच विराट सेनेने इंग्लंड संघावर वर्चस्व गाजवले. सगळ्याच आघाडीवर इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे.

दुसर्‍या कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भक्कम मैदानात उभा राहिला. पहिल्या डावात 231 चेंडूत 161 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या डावात अजिंक्य रहाणेनेही महत्त्वपूर्ण 67 धावा फटकावल्या.

वृषभ पंतनेही शानदार फलंदाजी केली आणि 58 धावा करत नाबाद राहिला. पहिल्या डावात टीम इंडियाने 329 धावा करुन आपले स्थान मजबूत केले. 329 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ पूर्ण अपयशी ठरला आणि तो केवळ 134 धावांवर आटोपला. अश्विनने टीम इंडियाकडून शानदार गोलंदाजी केली आणि 5 गडी बाद केले.

अश्विन आणि विराट कोहली दुसर्‍या डावात टीम इंडियासाठी नायक ठरले. ज्यावेळी टीममधील अनेक सहकारी खेळाडू झटपट बाद होताना दोघांनी किल्ला लढवला. कर्णधार विराट कोहली एका बाजूला टीमचे नेतृत्व करताना धावाही करत होता. अश्विनने त्याला चांगली साथ दिली. दोघांनीही 177 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने 149 चेंडूंत 62 धावा केल्या तर अश्विनने जोरदार खेळी केली आणि 148 चेंडूत 106 धावा करत शतक झळकावले.