Ind vs Eng Test: भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून, यावेळी आघाडीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यशस्वी जयस्वालने आपलं पहिलं दुहेरी शतक ठोकलं आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. एकीकडे इतर भारतीय फलंदाज इंग्लंडसमोर अपयशी ठरत असताना यशस्वी मात्र भक्कमपणे मैदानात उभा राहिला आणि भारताचा डाव सावरला. यशस्वी जैस्वालने पहिल्या दिवशी नाबाद 179 धावा केल्या. पहिल्या दिवशी भारताचा डाव 336 धावांवर 6 गडी बाद होता. यानंतर दुसऱ्या दिवशी यशस्वीने आपलं दुहेरी शतक पूर्ण केलं.
यशस्वी वगळता भारताचा एकही फलंदाज 35 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. दरम्यान यशस्वीने फक्त 10 डावांमध्ये ठोकलेलं हे दुसरं शतक आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वीने आपण एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत असून, यामुळेच आपण 93 ओव्हर्स खेळू शकलो असं सांगितलं.
"मला प्रत्येक सत्रानुसार खेळायचं होतं. जेव्हा ते चांगली गोलंदाजी करत होते, तेव्हा तो स्पेल संपण्याची मी वाट पाहिली. सुरुवातीला, विकेट ओलसर होती आणि थोडीशी फिरकी आणि उसळी होती. मात्र, मला खराब चेंडूंवर चांगले फटके मारुन शेवटपर्यंत खेळायचं होतं. मला याचं रुपांतर दुहेरी शतकात करायला आणि संघासाठी शेवटपर्यंत खेळायला मला आवडेल,” असं यशस्वीने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर सांगितलं होतं. दरम्यान दुसऱ्या दिवशी यशस्वीने दुहेरी शतक पूर्ण केलं आणि 209 धावांवर बाद झाला.
दरम्यान माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राने यशस्वीच्या प्रयत्नांची तुलना सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली आहे. "यशस्वीने सर्वात जबरदस्त खेळी केली आहे. त्याने किती चांगली फलंदाजी केली. जिम्मी अँडरसने एकमेव जलद गोलंदाज होता आणि तो सतत त्याचे चेंडू न खेळता सोडत होता. त्याने जेम्सच्या गोलंदाजीचा चांगला आदर केला," असं आकाश चोप्रा म्हणाला.
"फिरकी गोलंदाज आल्यानंतर त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन चौकार लगावले. यानंतर त्याने आपण विशेष खेळाडू का आहोत हे दाखवून दिलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक शतके झळकावणाऱ्या या खेळाडूचा अर्धशतकांचं शतकांमध्ये रूपांतर करण्याचा रेट 73 आहे. तो सध्या सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही मोठा आहे. तो जबरदस्त आहे", असं आकाश चोप्रा म्हणाला.
"यशस्वी आपल्या नावाला न्याय देत आहे. आपण उत्तम खेळाडू असल्याचं तो वारंवार सिद्ध करत आहे. तो एकटा मैदानात उभा राहिला. एका बाजूला यशस्वी आणि दुसऱ्या बाजूला अख्खा भारतीय संघ अशी स्थिती आहे," असं कौतुक आकाश चोप्राने केलं आहे.
"फिरकी गोलंदाजी कशी खेळायची हे त्याने दाखवून दिलं आहे. ही वाईट खेळपट्टी नाही. येथे फिरकीला फार मदत मिळत नाही आहे. पण यशस्वीने चांगली फलंदाजी केली. शतक पूर्ण करताना षटकार ठोकताना तो अजिबात अडखळला नाही," असंही कौतुक त्याने केलं.