India vs Bangladesh: 'मी हरभजनची जागा...', शतकी खेळी आणि 7 विकेट्सनंतर आर अश्विन स्पष्टच बोलला, 'IPL मुळे लोक...'

India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला असून, या विजयात आऱ अश्विनने (R Ashwin) मोलाचा वाटा उचलला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 22, 2024, 04:31 PM IST
India vs Bangladesh: 'मी हरभजनची जागा...', शतकी खेळी आणि 7 विकेट्सनंतर आर अश्विन स्पष्टच बोलला, 'IPL मुळे लोक...' title=

India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला असून, या विजयात आऱ अश्विनने (R Ashwin) मोलाचा वाटा उचलला आहे. पहिल्या डावात आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर आऱ अश्विनने शतकी खेळी करत डाव सावरला आणि दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत विजय भारताच्या पदरात टाकला. दरम्यान या विजयानंतर बोलताना आर अश्विन काहीसा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आपण आयपीएलमधून नाव कमावून आलो असल्याने लोकांना आपल्या कसोटी खेळावर शंका होती असं आर अश्विनने सांगितलं आहे. 

उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची जागा भरुन काढण्यासाठी भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आलं होतं. पण आपण इतकी मोठी जबाबदारी पार पडू शकणार की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका होती अशी कबुलीही त्याने दिली. पण आऱ अश्विनने आपल्या गोलंदाजीने सर्वांना उत्तर दिलं असून आज त्याच्या नावावर 101 कसोटी सामन्यात 522 विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. 

आऱ अश्विनने क्रिकेट खेळताना हरभजन सिंगचा आदर्श ठेवला होता. पण आज त्याच्या नावावर हरभजनपेक्षा जास्त विकेट्स आहेत. 37 वेळा त्याने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यासह आर अश्विन क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडूंच्या यादीत गेला आहे. 

"कसोटी सामन्यावर माझा प्रभाव नेमका कसा आहे यावर मी भाष्य करु शकत नाही. माझ्यावर फार मोठी जबाबदारी होती. मी हरभजनच्या जागी आलो होती. मी ज्युनिअर क्रिकेट खेळताना त्याच्याप्रमाणे अॅक्शन करत असे. तो माझ्यासाठी प्रेरणा होता. मी आयपीएलमधून आलो असल्याने अनेकांनी माझ्या कसोटी क्रिकेटवर शंका घेतली होती. पण अनेक लोकांनी पुढे येऊन मला मदत केली," असं अश्विन म्हणाला.

अश्विनने यावेळी आपण खेळात उतरताना गोलंदाजाच्या मानसिकतेने उतरतो, मात्र फलंदाजी नैसर्गिक असते असं सांगितलं. खेळाच्या दोन पैलूंचे विभाजन करण्यास आपण शिकत आहोत असंही तो म्हणाले. त्याने सांगितलं की, "मी गोलंदाजीमुळे जगत असून, तीच प्राथमिकता आहे. फलंदाजी ही मात्र नैसर्गिकरित्या येत असून, मी माझे विचार फलंदाजीवर केंद्रित केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मी विभागणी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे काम प्रगतीपथावर आहे".

"मी जे करत आहे त्यामुळे मला खेळाचा आनंद घेता येत आहे. त्यातून काय मिळावं या अपेक्षेने मी खेलथ नाही. शतकामुळे लढण्याची संधी मिळाली. मी यापूर्वी अनेक संघसहकाऱ्यांना असे करताना पाहिले आहे. ही एक खास खेळी होती, दुसऱ्या दिवसापर्यंत ती सुरु राहिली. प्रत्येक वेळी मी चेन्नईमध्ये खेळताना एक सुखद भावना असते. मी त्या स्टँडमधून अनेक कसोटी, आंतरराष्ट्रीय सामने पाहिले आहेत. त्या नूतनीकरण केलेल्या स्टँड्ससमोर ही कामगिरी करणं फार छान आहे," असं आर अश्विन म्हणाला.