ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजला ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. भारतानं ७० वर्षांमध्ये ११ वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. यातल्या एकाही दौऱ्यात भारताला टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. टेस्ट सीरिज सुरु होण्याआधी भारतानं ऑस्ट्रेलियात सराव सामना खेळला. हा सामना ड्रॉ झाला पण यामुळे भारतीय टीमची कमजोरी समोर आली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाची सुरुवात ३५६/६ अशी केली. तरी त्यांची टीम ५४४ रनचा मोठा स्कोअर करून ऑल आऊट झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं २ विकेट गमावून २११ रन केले आणि मॅच ड्रॉ झाली. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समननी सराव मॅचमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं, पण भारतीय बॉलरना फारशी चमक दाखवता आली नाही.
सराव सामन्यातच विरोधी टीम जर ५०० रनचा आकडा गाठत असेल तर ऑस्ट्रेलियाच्या टीमसमोर बॉलिंग कशी होणार ही बाब भारतीय टीमची चिंता नक्कीच वाढवेल. या मॅचमधली भारताची कमजोर बॉलिंग बघून भारताचा कर्णधार विराट कोहलीनंच हातात बॉल घेऊन बॉलिंग केली. भारताकडून मोहम्मद शमीनं ३ विकेट, अश्विनला २ विकेट आणि उमेश यादव, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
या सराव सामन्यामध्ये भारताचा ओपनर पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे तो पहिली टेस्ट मॅच खेळू शकणार नाही. सराव सामन्यात शॉनं ६९ बॉलमध्ये ६६ रनची खेळी केली. पहिल्या टेस्टमध्ये शॉ ओपनिंगला येईल हे निश्चित होतं, पण चुकीच्या वेळी दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या ओपनरसाठीच्या भारताच्या चिंता वाढल्या आहेत. या सीरिजमध्येही शॉ खेळेल का नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे केएल राहुल आणि मुरली विजय पहिल्या टेस्टमध्ये ओपनिंगला येतील हे निश्चित मानलं जातंय. सराव सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विजयनं शतक केलं तर राहुलनं ६२ रन केले. पहिल्या इनिंगमध्ये राहुलला मोठा स्कोअर करता आला नव्हता. सराव सामन्यात विजयनं १३२ बॉलमध्ये १२९ रनची खेळी केली, यामध्ये १६ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये विराट कोहलीनंतर मुरली विजय सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. मुरली विजयनं ४ टेस्टमध्ये ६०.४२ च्या सरासरीनं ४८२ रन केले होते.
पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम रविंद्र जडेजा किंवा अश्विनला ऑल राऊंडर म्हणून खेळवणार का विहारी किंवा रोहितपैकी एकाला सहाव्या क्रमांकावर संधी देणार याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हलमध्ये झालेल्या टेस्टमध्ये हनुमा विहारीला संधी देण्यात आली होती. त्या मॅचमध्ये विहारीनं अर्धशतक केलं होतं. हनुमा विहारी हा ऑफ स्पिन बॉलिंगही करतो. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये विहारीला संधी देण्यात आली नाही. रोहित शर्माकडे असलेल्या २५ टेस्टच्या अनुभवामुळे त्यालाही पहिल्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळू शकते.
या सराव सामन्यामध्ये भारतीय बॅट्समननी दमदार बॅटिंग केली. सिडनीमध्ये झालेल्या या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणेनं अर्धशतक केलं. दुसऱ्या इनिंगमध्ये राहुलनं अर्धशतक आणि मुरली विजयनं शतक केलं.