निवड समिती मला फिनिशर म्हणून पाहतेय - केदार जाधव

केदारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नॉटआऊट ८१ रन केल्या.

Updated: Mar 3, 2019, 07:52 PM IST
निवड समिती मला फिनिशर म्हणून पाहतेय - केदार जाधव title=

हैदराबाद : ऑस्ट्रेलिया विरुद्धात झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने विजय झाला. केदार जाधव आणि महेंद्र सिंह धोनी हे या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. धोनीने नाबाद ५९ रनची खेळी केली. तर केदार जाधवने नाबाद  ८१ रनचा रतीब घातला.  सोबतच बॉलिंग करताना त्याने १ विकेट देखील घेतला. 

'मी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सहाव्या क्रमांकावर बॅटींग करत आहे. जानेवारी २०१७ ला जेव्हा भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर होती, त्यावेळेस मी पहिल्यांदा सहाव्या क्रमांकावर खेळलो. तेव्हा पासून मला टीम मॅनेजमेंट एक फिनीशर म्हणून पाहते आहे.' असे केदार जाधव म्हणाला. या संदर्भाचे वृत्त आयसीसीने दिले आहे. 
  
'जो पर्यंत तु टीममध्ये असशील तेव्हापर्यंत सहाव्या क्रमांकावर खेळणार असे मला टीम मॅनेजमेंट कडून सांगण्यात आले होते.' असे केदार जाधव म्हणाला. 'आपण भारतासाठी खेळतो आणि सातत्याने चांगली कामगिरी करतो, तेव्हा बरं वाटतं. मी अनेकदा दुखापतीमुळे टीमबाहेर होतो. पण यानंतर देखील जेव्हा टीम मध्ये पुनरागमन केले तेव्हा टीममधील प्रत्येकाने मला प्रोत्साहन दिले.' असेही केदार म्हणाला. या सर्वाचं श्रेय हे कॅप्टन आणि टीमचं आहे. ज्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली आणि प्रोत्साहन दिले. टीमने दाखवलेल्या विश्वास मी सार्थ ठरवला.

केदार जाधवने ऑस्ट्रेलिया विरोधाच्या सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ७ ओव्हर टाकल्या. यात त्याने ३१ रनच्या मोबदल्यात १ विकेट घेण्याची कामगिरी केली. यावर केदार म्हणाला की 'मी कधी विचार देखील केला नव्हता की मी मॅचमध्ये १० ओव्हर बॉलिंग करु शकेन. जे आता करतोय. जर टीमला माझी गरज आहे, आणि परिस्थिती देखील माझ्या बाजूने असेल तर मी बॉलिंग करु शकतो.' 

केदार जाधवची वनडे कारकिर्द 

केदार जाधवने आपल्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील पहिली मॅच १६ नोव्हेंबर २०१४ साली श्रीलंकेसोबत खेळला आहे. केदार जाधव वनडे मध्ये आतापर्यंत ५५ मॅच खेळला आहे. यापैकी ३६ डावात खेळताना त्याने १०८३ रन केल्या आहेत. यात २ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १२० ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

गेल्या काही काळापासून भारताला एका चांगल्या फिनिशरची गरज होती. भारत संकटात असताना धोनी तारणहार ठरायचा. पण धोनीनंतर केदार जाधवकडे आता एक चांगला फिनीशर म्हणून पाहिले जात आहे. केदार बॅटिंग सोबत बॉलिंगने देखील कमाल करत आहे. भारताला गरजेच्यावेळी विकेट मिळवून देण्याची कामगिरी देखील यशस्वीरित्या पार पाडत आहे. त्यामुळे केदार कडून अशाच चांगल्या कामगिरीची आशा आहे.