विराटवर विश्वास नाही, ऑस्ट्रेलियाच्या मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात

२१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

Updated: Nov 19, 2018, 07:44 PM IST
विराटवर विश्वास नाही, ऑस्ट्रेलियाच्या मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात title=

गाबा : २१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियानं मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या टीमनं भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या स्लेजिंगमध्ये सहभागी होणार नाही, असं विराट म्हणाला होता. यावरून ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं विराटवर निशाणा साधला. मला विराट कोहलीवर विश्वास नाही. स्लेजिंग करणार नाही असं विराटनं माध्यमांना सांगितल्याचं मी ऐकलं. पण त्यानं जर असं केलं तर मला आश्चर्य वाटेल, असं वक्तव्य पॅट कमिन्सनं केलं आहे.

विराट हा जबरदस्त प्रतिस्पर्धी आहे आणि त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया पॅट कमिन्सनं दिल्याचं वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डनं दिलं आहे. कोणीही उचकवलं नाही तरी मी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करू शकतो. मला वैयक्तिकदृष्ट्या अशा गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. मला माझ्या क्षमेतवर पूर्ण विश्वास आहे, असं कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी म्हणाला होता.

'कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगा'

विराट कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप डुप्लेसिसनं ऑस्ट्रेलियाच्या टीमला दिला आहे. प्रत्येक टीममध्ये एक-दोन असे खेळाडू असतात ज्यांना उचकवलं किंवा वादात ओढलं तर त्यांचा खेळ उंचावतो. विराट कोहली असाच खेळाडू आहे. आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सीरिजवेळी शांत राहण्याची रणनिती आखली होती. यानंतरही विराटनं सीरिजमध्ये सर्वाधिक रन केले. पण तरी आम्ही सीरिज जिंकण्यात यशस्वी झालो, असं फॅप म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराटनं ३ टेस्टमध्ये ४७.६६ च्या सरासरीनं २८६ रन केले होते. 

२१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ३ टी-२०, ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजवेळी विराटला शांत ठेवा, ऑस्ट्रेलियानं विराटवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तर तो आणखी चांगली कामगिरी करेल, असा सल्ला फॅपनं ऑस्ट्रेलियाच्या टीमला दिला आहे.