गाबा : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टी-२० सीरिजला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. याआधी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गज खेळाडूंची भेट घेतली. सगळ्यात आधी विराटनं ऑस्ट्रेलियाचा फूटबॉलपटू एवरटॉन टिम काहीलला भेटला. यानंतर त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टचीही भेट घेतली. भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला रवाना झाली आहे. या दौऱ्यामध्ये भारत ३ टी-२०, ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.
या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजमध्ये पराभूत करण्याची संधी भारतीय टीमकडे आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन प्रमुख बॅट्समन स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ते या सीरिजमध्ये खेळणार नाहीत. २०१४-१५ साली झालेल्या टी-२० सीरिजमध्ये भारतानं ३-०नं ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश केलं होतं.
विराट कोहली आणि अॅडम गिलख्रिस्टच्या भेटीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे आणि टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे.
अॅडम गिलख्रिस्टसोबतच ऑस्ट्रेलियाचा फूटबॉलपटू टिम काहीलनं विराट कोहलीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
२१ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-२० सीरिजला सुरुवात होईल. या दौऱ्यात भारत पहिले टी-२० सीरिज मग टेस्ट सीरिज आणि मग वनडे सीरिज खेळणार आहे. वर्ल्ड कपआधी भारत फक्त १३ वनडेच खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीनं या दौऱ्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे.