INDvsAUS: तिसऱ्या टेस्टमध्ये द्विशतक करणार, अजिंक्य रहाणेचा विश्वास

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे

Updated: Dec 24, 2018, 10:01 PM IST
INDvsAUS: तिसऱ्या टेस्टमध्ये द्विशतक करणार, अजिंक्य रहाणेचा विश्वास title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये आपण फक्त शतकच नाही तर द्विशतकही झळकावू शकतो, असा विश्वास भारतीय टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं व्यक्त केला आहे. रहाणेनं या सीरिजच्या २ टेस्टमध्ये २ अर्धशतकांच्या मदतीनं १६४ रन केले आहेत. मागच्यावर्षी कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक केल्यानंतर रहाणेला शतक करता आलेलं नाही. ऍडलेड टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रहाणेनं ७० आणि पर्थ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ५० रन केले होते.

मी सध्या ज्या लयीमध्ये बॅटिंग करत आहे ते पाहता मेलबर्नमध्ये होणाऱ्या टेस्टमध्ये मी द्विशतकही करु शकतो, असं रहाणे म्हणाला. २०१४ साली मेलबर्नमध्ये रहाणेनं शतक केलं होतं. त्या मॅचमध्ये विराट कोहलीनंही एक शतक आणि एक अर्धशतक केलं होतं.

मी परिस्थितीला चांगलं समजू शकतो. जर मी अशाचप्रकारे बॅटिंग केली तर याचा टीमला फायदा होईल. वैयक्तिक रेकॉर्ड नंतरही बनवता येतील, अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेनं दिली आहे.

म्हणून परदेशात विजय नाही

जर परदेशामध्ये सारखे विजय मिळवायचे असतील तर बॅट्समनना बॉलरशी सहयोग करावा लागेल. भारताला दक्षिण आफ्रिकेत १-२ आणि इंग्लंडमध्ये १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. बॅट्समनच्या कामगिरीत सातत्य नसणं हे भारतीय टीमच्या पराभवाचं मुख्य कारण होतं. ऑस्ट्रेलियामधली ४ टेस्ट मॅचची सीरिज सध्या १-१नं बरोबरीत आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला होता. तर दुसरी टेस्ट १४६ रननी गमवावी लागली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून भारतीय बॉलर विरुद्ध टीमला दोन वेळा ऑल आऊट करत आहे. पण बॅट्समन चांगली कामगिरी करत नसल्याचं रहाणेनं कबुल केलं. पुढच्या २ टेस्ट मॅचमध्ये भारताला प्रत्येक सत्राच्या हिशोबानं खेळावं लागेल, असं रहाणेनं सांगितलं.

पर्थमध्ये संधी गमावली

पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताकडे मोक्याच्या क्षणी संधी होत्या, पण आम्हाला या संधीचं सोनं करता आलं नाही, असं वक्तव्य रहाणेनं केलं. दुसऱ्या टेस्टनंतर आम्हाला चांगला आराम मिळाला आहे, ज्याची आवश्यकता होती. आता पुन्हा आम्ही ताजेतवाने झाल्याचं रहाणे म्हणाला.