बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा निसटता पराभव झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या २ मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच उद्या २७ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये खेळवण्यात येणार आहे. सीरिजच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे. दुसरी मॅच जिंकून सीरिज जिंकण्याचा विचार ऑस्ट्रेलियाचा असेल. तर ही मॅच जिंकून सीरिज १-१ ने बरोबरीत करायचा भारताचा मानस असेल. ऑस्ट्रेलिया टीमला आतापर्यंत भारतात टी-२० सीरिज जिंकता आलेली नाही. त्यामुळे ही कामगिरी करण्याची संधी देखील ऑस्ट्रेलियाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला. विजयासाठी १२७ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. १२७ रनचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या भारतीय बॉलरनी नाकी नऊ आणले. जसप्रीत बुमराहनं ४ ओव्हरमध्ये फक्त १६ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना आऊट केलं. शेवटच्या २ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६ रनची गरज होती. पण १९व्या ओव्हरमध्ये बुमराहनं फक्त २ रन दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ रनची गरज होती, पण उमेश यादवला ऑस्ट्रेलियाला रोखता आलं नाही.
आता दुसऱ्या टी-२०मध्ये विजय मिळवून सीरिज बरोबरीत सोडवण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे. या मॅचसाठी भारतीय टीममध्ये काही बदलही होऊ शकतात. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टी-२० आणि वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत भारताला तिसऱ्या फास्ट बॉलरची कमतरता जाणवत आहे. मागच्या मॅचमध्ये भारतानं युझवेंद्र चहल, मयंक मार्कंडे आणि कृणाल पांड्या या तीन स्पिनरचा वापर केला होता. या मॅचमध्ये कृणाल पांड्या किंवा मयंक मार्कंडेच्याऐवजी विजय शंकरला संधी दिली जाऊ शकते.
पहिल्या टी-२०मध्ये शेवटच्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ रनची गरज होती. पण फास्ट बॉलर उमेश यादवला ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता आलं नाही. यानंतर उमेश यादववर टीकाही झाली. दुसऱ्या टी-२०मध्ये उमेशऐवजी सिद्धार्थ कौलला खेळवण्याचा विचार होऊ शकतो.