India vs Afghanistan 3rd T20: एकाच टी-20 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी केलेल्या 200 हून अधिक धावा, एक नाही तर 2-2 सुपर ओव्हर्सनंतर काल बंगळुरुमध्ये झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तानदरम्यानच्या टी-20 सामन्याचा निकाल लागला. रोहित शर्माचं शतक आणि रिंकू सिंहच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या गुलबदीन नैबनेही धम्माल फलंदाजी केली. मात्र या सामन्याचा खरा हिरो कोण आहे असं विचारलं तर शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीचं नाव घ्यावं लागेल. आता गोल्डन डकवर बाद झालेल्या विराटने असं केलंय तरी काय? जाणून घेऊयात याबद्दल पण सामन्यात काय घडलं ते पाहूयात...
भारताने कशी खेळी केली?
भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहितच्या या निर्णयाला साजेशी कामगिरी केवळ रोहितने स्वत: आणि रिंकू सिंहने केली. रिंकूने 39 चेंडूंमध्ये 69 धावा केल्या. तर रोहित शर्माने 69 चेंडूंमध्ये 121 धावांची भन्नाट खेळी केली. या दोघांची जोडी जमण्याआधी भारताने 22 धावांवर 4 गडी गमावले होते. रिंकू आणि रोहित शर्माने नाबाद 190 धावांची पार्टनरशीप केली. भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 212 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्ताननेही इतक्याच धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
पहिली सुपर ओव्हर
20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात अफगाणिस्तानने 212 धावा केल्या. अफगाणिस्तानी संघाकडून रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जारदान आणि गुलबदीन नैब या तिघांनी अर्धशतकं झळकावली. नैबने 23 चेंडूंमध्ये 55 धावांची नाबाद खेळी केली. तर मोहम्मद नबीने 16 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. दोन्ही संघाच्या समान धावा राहिल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 1 विकेटच्या मोबदल्यात 16 धावा केल्या. भारताने सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माने सलग 2 षटकार लगावले. पाचव्या बॉलवर एक धाव काढून रोहित रिटायर्ड आऊट झाला. शेवटच्या बॉलवर भारताला विजयासाठी 2 धावा हव्या होत्या. मात्र भारताला एकच धाव करता आली आणि पुन्हा नव्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
दुसरी सुपर ओव्हर
दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने पहिल्यांदा बॅटिंग केली. रोहित शर्माने पहिल्या 2 चेंडूंमध्ये चौकार आणि षटकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर रिंकू सिंह बाद झाला. पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा धावबाद झाला. भारताने 11 धावा केल्या. अफगाणिस्तानी संघ तिसऱ्यांदा मैदानात फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताचा फिरकीपटू रवि बिश्नोईने 3 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला.
विराट कसा ठरला हिरो?
आता विराटच्या योगदानाबद्दल बोलायचं झालं तर अफगाणिस्तानची फलंदाजी सुरु असताना 17 व्या ओव्हरमध्ये त्याने एक चमत्कारच केला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर 5 व्या बॉलवर करीम जनतने एक भन्नाट फटका मारला. लाँग ऑनवर विराट कोहली फिल्डींग करत होता. ज्या पद्धतीने बॉल बॅटला लागला ते पाहून जनतला हा सिक्सच जाणार असं वाटलं. मात्र कोहलीने असं घडू दिलं नाही. विराटने सीमारेषेजवळ अगदी नियोजनपूर्वकपणे अचूक वेळी उडी घेत चेंडू हवेतच अडवला. विराटने आपल्या उजव्या हाताने हवेत झेपावत बॉल पकडला. विराटला फार वेळ हा बॉल धरुन ठेवता आला नाही कारण तो सीमारेषेच्यापलीकडे पडणार होता. कोहलीने जमीनीला स्पर्श करुन बॉण्ड्री लाइनपलीकडे पडण्याआधीच बॉल पुन्हा सामन्यात फेकला आणि तो खाली पडला. विराटच्या या भन्नाट फिल्डींगमुळे 5 धावा भारताला वाचवता आल्या. या धावा वाचवल्या नसत्या तर हा नक्कीच सिक्स होता. असं झालं असतं तर सामना सुपरओव्हरमध्ये गेला नसता आणि भारत जिंकला नसता.
Excellent effort near the ropes!
How's that for a save from Virat Kohli
Follow the Match https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @imVkohli | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0AdFb1pnL4
— BCCI (@BCCI) January 17, 2024
विशेष म्हणजे विराटने ज्या पद्धतीने हवेत झेप घेत हात वर करुन बॉल अडवला ती पोज अगदी जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना असा दिसतो तशीच असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. केवळ बुमराहची पोज देत विराटने भारताला या 5 धावा वाचवून सामाना जिंकून दिल्याची चर्चाही चाहत्यांमध्ये आहे.
The Virat Kohli save at the boundary is looking like Jasprit Bumrah's bowling action. pic.twitter.com/1aETp5gQCA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2024
भारताने या विजयासहीत मालिका 3-0 ने जिंकली.