दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज २-१नं गमावल्यानंतर भारतीय टीम आता वनडे सीरिजसाठी मैदानात उतरेल.

Updated: Jan 31, 2018, 08:03 PM IST
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात title=

डरबन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज २-१नं गमावल्यानंतर भारतीय टीम आता वनडे सीरिजसाठी मैदानात उतरेल. डरबनच्या मैदानामध्ये उद्या पहिली मॅच खेळवली जाणार आहे. ही सीरिज सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेला धक्का बसला आहे. बोटाच्या दुखापतीमुळे एबी डिव्हिलयर्स पहिल्या तीन मॅचना मुकणार आहे.

भारताचं लाजीरवाणं रेकॉर्ड

१९९२-९३ सालापासून भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये ६ वनडे सीरिज खेळल्या आहेत. या सगळ्या वनडे सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या २८ वनडेंपैकी २१ मॅचमध्ये भारताचा पराभव, ५ मॅचमध्ये विजय झाला तर २ मॅचचा कोणताही निकाल लागला नाही.

आत्तापर्यंत डरबनमध्ये भारत फक्त २ मॅच जिंकला आहे. या दोन्ही मॅच २००३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील आहेत. २००३ वर्ल्ड कपमध्ये डरबनमध्ये भारतानं इंग्लंड आणि केनियाला हरवलं आहे. तर दक्षिण आफ्रिका-भारतात डरबनमध्ये ७ वनडे झाल्या. यापैकी ६ मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला तर एका मॅचचा निकाल लागला नाही.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

१ फेब्रुवारी- पहिली वनडे- डरबन

४ फेब्रुवारी- दुसरी वनडे- सेंच्युरिअन

७ फेब्रुवारी- तिसरी वनडे- केप टाऊन

१० फेब्रुवारी- चौथी वनडे- जोहान्सबर्ग

१३ फेब्रुवारी- पाचवी वनडे- पोर्ट एलिझाबेथ

१४ फेब्रुवारी- सहावी वनडे- सेंच्युरिअन