भारताने असा खेळ दाखवला की, हिऱ्याची अंगठी सोडून खेळाडूंना भेटायला गेले Pele

Pele Death: ब्राझीलचे महान खेळाडू पेले (Brazilian footballer Pele) यांचे भारताशी (India) खास कनेक्शन होते. क्लब ऑफ इंडियाने पेलेच्या संघाचा जवळपास पराभव केला, परंतु वादग्रस्त पेनल्टीमुळे पेलेचा संघ पराभवापासून वाचला.

Updated: Dec 30, 2022, 08:48 AM IST
भारताने असा खेळ दाखवला की, हिऱ्याची अंगठी सोडून खेळाडूंना भेटायला गेले Pele  title=

Brazilian Football Legend Pele: 24 डिसेंबर 1977 चा दिवस. कोलकाताचे ईडन गार्डन फुटबॉल क्रीडाप्रेमींनी खचाखच भरले होते. फक्त ब्लॅक पर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेले (Football Legend Pele) यांची जादू पाहण्यासाठी रस्तेही जाम झाले होते. पेले मैदानावर उतरताच संपूर्ण स्टेडियममध्ये त्यांच्या नावाचा घोष सुरु झाला, पण 90 मिनिटांत इतिहासाच्या पानांत आणखी काही लिहिलं जाईल आणि येणारी 90  मिनिटं रेकॉर्डमध्ये नोंदवली जातील हे कदाचित भारतीयांनाही माहीत नसेल. 

ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले भारताचा सर्वात मोठा फुटबॉल संघ मोहन बागानविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आले होते. हा निव्वळ मैत्रीचा सामना होता म्हणे, पण फुटबॉलमध्ये भारतीयही कमी नाहीत हे जगाला दाखवून देण्याची ही भारतासाठी संधी होती आणि ती कामगिरी भारतीयांनी चोख बजावली. यावेळी पेले यांचे मन भारतीय खेळाडूंनी जिंकले.

पेले यांना गोल करता आला नाही

तीन वेळचा विश्वविजेता पेले यांचा संघ न्यूयॉर्क कॉसमॉस आणि मोहन बागान यांच्यात सामना सुरु झाला. सामना सुरु होताच भारतीय संघाने पेले यांच्या संघावर चढाई केली. पीके बॅनर्जीच्या संघ मोहन बागानने फुटबॉलच्या बादशहाला गोल करण्यापासून रोखले नाही तर सामनाही जवळपास 2-1 असा जिंकला, परंतु वादग्रस्त पेनल्टीच्या जोरावर पेले यांच्या संघाने सामना 2-2 असा बरोबरीत सोडवला. पराभव टाळण्यासाठी पेलेच्या संघाने सर्व ताकद पणाला लावली होती.

सर्वात आधी भारतीय खेळाडूंची भेट घेतली

संध्याकाळी, मोहन बागानने पेले यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे त्यांना हिऱ्याची अंगठी दिली जाणार होती, परंतु पेले या अंगठीपेक्षा भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी अधिक उत्सुक होते. भारतीय क्लब संघ त्यांना अशी टक्कर देईल कल्पना नव्हती. मोहन बागानकडून श्याम थापा आणि हबीब यांनी गोल केले. बॅनर्जी यांच्या टीमने गौतम सरकार यांच्यावर पेले यांना रोखण्याची मोठी जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती चोख बजावली. पेले यांनीही त्यांचे कौतुक केले.

पेले यांचे निधन

फुटबॉलचं मैदान गाजवणारा हा खेळाडू कॅन्सरविरोधातील झुंज हरला. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते. पेले या नावानं प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस इथं झाला होता. पेले यांनी 1958मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.