सिडनी: भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आज सिडनीच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नसल्याने सरस धावगतीच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. यापूर्वी झालेल्या सात ट्वेन्टी-२० विश्वषचक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नव्हती. मात्र, यंदा पहिल्यांदाच भारतीय संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात असलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत आपल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली होती. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.
यापूर्वी इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८च्या विश्वचषकात भारताला हरवले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ इतिहास बदलणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, पावसामुळे इंग्लंडच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आणि भारतीय संघाला विनासायास अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.
यानंतर आजच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. हा सामनाही पावसामुळे रद्द झाल्यास ब गटात अव्वलस्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.