पहिली टी-२० : रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा पराभव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला आहे.

Updated: Feb 24, 2019, 10:34 PM IST
पहिली टी-२० : रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा पराभव title=

विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला आहे. भारतानं ठेवलेल्या १२७ रनचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियानं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १२७ रन केले. यामुळे ऑस्ट्रेलियानं ही मॅच ३ विकेटनं जिंकली. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं २ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे.

२० ओव्हरमध्ये १२६/७ एवढीच धावसंख्या करणाऱ्या भारतानं बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ रनची आवश्यकता होती. पण उमेश यादवच्या या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला तेवढ्या रन मिळाल्या. जसप्रीत बुमराह हा भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. बुमराहनं ४ ओव्हरमध्ये १६ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि कृणाल पांड्याला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलनं ४३ बॉलमध्ये सर्वाधिक ५६ रनची खेळी केली. तर ओपनिंगला आलेल्या डाआर्सी शॉर्टनं ३७ बॉलमध्ये ३७ रन केले.

टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं भारताला २० ओव्हरमध्ये १२६/७ या स्कोअरवर रोखलं. पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलनं ३६ बॉलमध्ये ५० रन करून आपण पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याचं दाखवलं. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा ओपनिंगला आले होते, पण रोहितला या मॅचमध्ये मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा फक्त ५ रन करून आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या विराट कोहलीनं राहुलबरोबर भारताचा डाव सावरण्याला सुरुवात केली. पण विराट कोहलीही १७ बॉलमध्ये २४ रन करून माघारी परतला. विराटची विकेट गेल्यानंतर भारतानं सातत्यानं विकेट गमावल्या. एमएस धोनीनं ३७ बॉलमध्ये २९ रनची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाईलनं ४ ओव्हरमध्ये २६ रन देऊन सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जेसन बेहरनडॉर्फ, ऍडम झम्पा आणि पॅट कमिन्स याला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.