पाचव्या टेस्टमध्येही भारताचा पराभव, सीरिज ४-१नं गमावली

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला आहे. 

Updated: Sep 11, 2018, 10:52 PM IST
पाचव्या टेस्टमध्येही भारताचा पराभव, सीरिज ४-१नं गमावली title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला आहे. याचबरोबर भारतानं ५ टेस्ट मॅचची ही सीरिज ४-१नं गमावली आहे. इंग्लंडनं ठेवलेल्या ४६४ रनचा पाठलाग करताना भारतीय टीम ३४५ रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून लोकेश राहुलनं १४९ रन तर ऋषभ पंतनं ११४ रनची खेळी केली. ऋषभ पंतचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पहिलं शतक होतं. ९५ रनवर असताना पंतनं सिक्स मारून त्याचं पहिलं शतक झळकावलं. याआधी टेस्ट क्रिकेटमधील पहिली रनही पंतनं सिक्स मारूनच केली होती.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा राहुल ४६ रनवर नाबाद होता. तेव्हा टीमचा स्कोअर ५८-३ एवढा होता. पण लोकेस राहुलनं रहाणेसोबत पार्टनरशीप करून इनिंगला आकार दिला. राहुल आणि रहाणेनं ११८ रनची पार्टनरशीप केली. अजिंक्य रहाणेची विकेट गेल्यानंतर हनुमा विहारी शून्य रनवर आऊट झाला. यानंतर राहुलनं पंतबरोबरही शतकी पार्टनरशीप केली. तर राहुल आणि पंतमध्ये २०४ रनची पार्टनरशीप झाली.

लोकेश राहुल आणि ऋषभ पंतच्या पार्टनरशीपनंतरही भारताला ही मॅच ड्रॉ करता आली नाही. शेवटच्या सत्रामध्ये भारतानं २० रनमध्ये ५ विकेट गमावल्या. लोकेश राहुलनं १४९ रन तर ऋषभ पंतनं ११४ रन केले.  इंग्लंडकडून जेम्स अंडरसननं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर सॅम कुरन आणि आदिल रशीदला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली आणि बेन स्टोक्सला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आपल्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या एलिस्टर कूकला मॅन ऑफ द मॅच देऊन तर सॅम कुरन आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. 

लोकेश राहुल दुसरा भारतीय

भारतीय ओपनर म्हणून चौथ्या इनिंगमध्ये एवढा स्कोअर करणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय आहे. या यादीमध्ये सुनिल गावसकर पहिल्या क्रमांकावर आहेत. १९७९ मध्ये ओव्हलच्या मैदानावरच गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध २२१ रन केले होते. तिसऱ्या क्रमांकावर गावसकर यांचेच ११७ रन आणि चौथ्या क्रमांकावर शिखर धवनच्या ११५ रनचा समावेश आहे. 

ऋषभ पंतचंही रेकॉर्ड

आशिया खंडाबाहेर शतक करणारा ऋषभ पंत हा चौथा भारतीय विकेट कीपर ठरला आहे. याआधी १९५९ साली विजय मांजरेकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ११८ रन, २००२ साली अजय रात्रानं वेस्ट इंडिजविरुद्ध ११५ नाबाद, २०१६ साली ऋद्धीमान सहानं वेस्ट इंडिजविरुद्ध १०४ रनची खेळी केली होती.