मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची क्रिकेट क्षितीजावरून थेट हकालपट्टी करण्याचे भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. आयसीसीला यासंदर्भात अधिकृत मेल करण्याचे आदेश बीसीसीआयचे मुख्य अधिकारी विनोद राय यांनी कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना दिले आहेत. विश्वचषकातून पाकिस्तानची हकालपट्टी करावी अशी भारताची मागणी असणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आयसीसीची बैठक दुबईतल्या मुख्यालयात होणार आहे. त्या बैठकीत भारत पाकिस्तानच्या हकालपट्टीची मागणी करणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय गळचेपी करण्याची भारताने भूमिका घेतली आहे. प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला एकट पाहून कोंडून मारण्याचा भारताने चंग बांधला आहे. त्याचाच हा एक भाग आहे. पाकिस्तानातही क्रिकेट हे प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे थेट विश्वचषकातूनच पाकिस्तानची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटर्सने पाकिस्तानवर टीका केली होती. हरभजन सिंह, सौरव गांगुली, चेतन चौहान, गौतम गंभीर आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी पाकिस्तान सोबत क्रिकेट न खेळण्याची मागणी केली होती.
सौरव गांगुलीने बुधवारी फक्त क्रिकेटच नाही तर संपूर्ण खेळांमधूनच पाकिस्तानसोबतचे संबंध तोडून टाकण्याची मागणी केली होती. पाकिस्तानसोबत न खेळल्याने भारताचं कुठेही नुकसान होणार नाही असं देखील गांगुलीने म्हटलं होतं.