Ind vs WI: पहिला सामना जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित नाराज; म्हणाला, 'वाटलं नव्हतं...'

Ind vs WI Rohit Sharma Upset: सामन्याचं सविस्तर विश्लेषण करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. स्वत: सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय़ कसा योग्य होता हे ही रोहितने यावेळेस सांगितलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 28, 2023, 08:05 AM IST
Ind vs WI: पहिला सामना जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित नाराज; म्हणाला, 'वाटलं नव्हतं...' title=
रोहितने सामन्यानंतर व्यक्त केली नाराजी

Ind vs WI Rohit Sharma Upset: भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये 5 विकेट्सने पराभूत केलं. मात्र संघाने विजयासहीत श्री गणेशा केल्यानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर नाराज असल्याचं सामन्यानंतर दिसून आलं. मला वाटलं नव्हतं की बार्बाडोसची खेळपट्टी एवढ्या लवकर खराब होईल. भारतीय संघाने 115 धावांचा पाठलाग करताना 5 गडी गमावले. मात्र 115 धावांसाठी 5 विकेट्स जातील असा विचार केला नव्हता असं म्हणत रोहितने उघडपणे नाराजी व्यक्त केली. स्वत: रोहित आणि विराटने खालच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरुन तरुणांना संधी देण्याच्या निर्णयाचं समर्थन त्याने केलं. सामन्यामध्ये यजमान संघाने 114 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 5 गडी गमावले. सामन्यामध्ये फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहिल्याचं दिसून आलं. सामन्यात एकूण 15 विकेट्स गेल्या त्यापैकी फिरकी गोलंदाजांनी 10 विकेट्स घेतल्या.

रोहितने सातव्या क्रमांकावर येण्यासंदर्भातही केलं भाष्य

रोहित शर्माने सामन्यानंतर बोलताना, मला वाटलं नव्हतं की खेळपट्टी अशाप्रकारे खराब होईल असं विधान करत नाराजी व्यक्त केली. पहिल्यांदा गोलंदाजी करणं आवश्यक होतं. खेळपट्टीमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी आणि फिरकी गोलंदाजांसाठी बराच वाव होता. आमच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धांना स्वस्तात बाद करुन चांगली कामगिरी केली, असं रोहित म्हणाला. मात्र फलंदाजी करताना 5 विकेट्स जातील असं वाटलं नव्हतं असंही रोहितने स्पष्टपणे सांगितलं. सलामीला येणारा रोहित शर्मा स्वत: काल 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यासंदर्भात बोलताना रोहित शर्माने, मला जुने दिवस आठवले जेव्हा मी फार नवखा खेळाडू होतो आणि याच क्रमांकावर फलंदाजीला यायचो, असं म्हटलं.

...म्हणून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलो

रोहित शर्माने, "मी भारतीय संघामधून जेव्हा पदार्पण केलं होतं तेव्हा मी पहिल्यांदा 7 व्या क्रमांकावरच फलंदाजीला आलो होतो. सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूंना खेळण्याची संधी देण्याच्या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही खेळाडूंना एकदिवसीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी देऊ इच्छितो. मागील काही आठवड्यांपासून ते क्रिकेट खेळलेले नाही त्यामुळे त्यांना वेळ देण्यासाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही हे करत राहू," असं सांगितलं.

फार संधी मिळतील असं वाटत नाही

सूर्यकुमार यादवला तिसऱ्या तर हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णयाचं रोहित शर्माने समर्थन केलं. मला नाही वाटत की त्यांना अशाप्रकारच्या अधिक संधी मिळतील, असं रोहित म्हणाला. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजाचं कौतुक केलं. मुकेश कुमार उत्तमप्रकारे बॉल स्विंग करतोय. घरगुती क्रिकेटमध्ये तो फारसा चर्चेत नव्हता. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ईशान किशननेही चांगली फलंदाजी केली, असंही रोहित म्हणाला.