मुंबई : टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्याच 3 वनडे आणि टी-20 सीरीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सीरीजबाबत माहिती दिली होती. तर श्रीलंका क्रिकेट बोर्डकडून देखील या सीरीजबाबत उत्सूकता होती. पण सध्याची परिस्थिती पाहता या दौऱ्यावर कोरोनाचं संकट दिसत आहे. त्यामुळे हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेत देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. संसर्ग वाढत असल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्ड देखील यावर नजर ठेवून आहे. कोरोनामुळे लोकांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. जगभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना क्रिकेट सामने घेणं जोखमीचं होऊ शकतं. कारण आयपीएलमध्ये इतकी काळजी घेऊन देखील कोरोनाचा संसर्ग खेळाडूंमध्ये झाला आणि संपूर्ण आयपीएल पुढे ढकलण्यात आली. खेळाडूंना देखील आपल्या घरी जाण्यास सांगण्यात आलं.
श्रीलंकेमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना भारतीय संघाला तेथे पाठवणं याबाबत देखील गंभीरतेने विचार होण्याची गरज आहे. एसएलसीचे सीईओ एश्ले डी सिल्वा यांनी देखील म्हटलं की, कोविड-19 संक्रमितांचा वाढता आकडा हा चिंतेचा विषय बनला आहे. पण त्यांना आशा आहे की, भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर येण्याआधी परिस्थिती नियंत्रणात येईल. ज्यामुळे क्रिकेट सीरीजचा मार्ग मोकळा होईल.
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचे अनेक महत्त्वाचे खेळाडू खेळणार नाहीत. कारण ते इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. इंग्लंडमध्ये देखील भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना आणि इंग्लंड विरुद्ध सामने खेळणार आहे.