दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तिघांचं कमबॅक

न्यूझीलंडमधून पराभव पत्करून परत आलेल्या भारतीय टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

Updated: Mar 9, 2020, 08:03 AM IST
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तिघांचं कमबॅक title=

मुंबई : न्यूझीलंडमधून पराभव पत्करून परत आलेल्या भारतीय टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना संधी मिळालेली नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ वनडे मॅचच्या सीरिजला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. दुसरी वनडे १५ आणि तिसरी वनडे १८ मार्चला होईल. शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे भारतीय टीमबाहेर होते.

हार्दिक पांड्याने याआधीची आंतरराष्ट्रीय मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळली होती. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पांड्या टी-२० मॅच खेळला होता. यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली होती. हार्दिकने डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली. पांड्याने ५५ बॉलमध्ये १५८ रन केले, यात २० सिक्सचा समावेश होता.

दुखापतीतून सावरणाऱ्या रोहित शर्माला या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजदरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे आणि टेस्ट सीरिजला मुकला होता. केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे यांना डच्चू देण्यात आला आहे.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल