IND vs PAK: ६ खेळाडू राखून भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना!

T20 World Cup 2024:  आज दुबईमध्ये महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान हा खेळवला गेला. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 6, 2024, 07:33 PM IST
IND vs PAK: ६ खेळाडू राखून भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना!   title=
Photo Credit: @ImTanujSingh /X

IND W vs PAK W :  महिला T20 विश्वचषक 2024 चा 7 वा साखळी सामना आज दुबईत खेळवला जात आहे. आजच्या भारत आणि पाकिस्तान या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानी कर्णधाराने निर्णय घेतला. पाकिस्तानी संघ संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 105 धावा केल्या आणि टीम इंडियाला विजयासाठी 106 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. सुरुवातीला स्मृती मानधना अवघ्या 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यासह 18 धावांवर भारतीय टीमला पहिला धक्का बसला. स्मृती मानधना नंतर शफाली वर्मा बाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांचीही विकेट गेली. सरते शेवटी ६ खेळाडू राखून भारताने विजय मिळवला. 

T20 विश्वचषकाच्या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह महिला क्रिकेट संघाने स्पर्धेतील आपले खाते उघडले आहे. भारताला यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. शेफाली वर्मा, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जच्या खेळीमुळे भारताने विजय मिळवला. सुरुवातीच्या षटकांमध्ये संथ फलंदाजी केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी वेग वाढवला.  

भारताची दमदार खेळी  

भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने उत्तम खेळी केली.  हरमनप्रीत 24 चेंडूत 29 धावा करून ती दुखापतग्रस्त झाली. तिने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. भारताकडून हरमनप्रीतशिवाय शेफाली वर्माने 32 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 23 धावा केल्या. स्मृती मानधना अवघ्या 7 धावा करून बाद झाली. पुढे रिचा घोषला एकही धावा न करता परत जावे लागले. दीप्ती शर्माने नाबाद 7 धावा तर सजाने नाबाद 4 धावा केल्या.

 

पाकिस्तानच्या कर्णधाराने घेतल्या विकेट्स  

पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने २ विकेट्स घेतल्या. फातिमाने 16व्या षटकात जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांना बाद करून प्रेशर बनवण्याचा प्रयत्न केला. 

गुणतालिका

या विजयासह भारताचे खाते उघडले आहे. भारतीय टीम गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय टीम अजूनही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या मागे आहे. चौघांचे 2-2 गुण आहेत, पण नेट रनरेटच्या आधारे टीम इंडिया खूपच खाली आहे. 

सामनावीर पुरस्कार

भारत पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय टीमच्या अरूंधती रेड्डिने १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्याने तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.