मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचं (ICC T20 World Cup) बिगूल वाजलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं (Team India) मिशन टी20 वर्ल्ड कप येत्या 24 तारखेपासून सुरु होत असून सलामीची लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) रंगणार आहे. या सामन्याबद्दल भारत आणि पाकिस्तानच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगताला उत्सुकता आहे.
याआधी भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटलं की भारतीय फलंदाजी विरुद्ध पाकिस्ताची गोलंदाजी अशीच लढत होत होती. पण आता चित्र बदललं आहे. भारतीय फलंदाजीबरोबरच भारतीय गोलंदाजीही जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीपैकी एक बनली आहे. त्यामुळे भारताविरुद्धचा हा सामना पाकिस्तानसाठी नक्कीच सोपा नसणार. भारत आणि पाकिस्तानपैकी कोणत्या संघाचे गोलंदाज पडणार भारी, पाहूया काय सांगते आकडेवारी.
भारत-पाकिस्तान गोलंदाजांची तुलना
भारतीय संघातील काही गोलंदाज बऱ्याच काळापासून संघात असल्याने तुलनेने अनुभवी आहेत. तर पाकिस्तानचे बहुतेक गोलंदाज नवखे आहेत. त्यामुळे वेगवान गोलंदाज असोत की फिरकी, कागदावर भारतीय संघ मजबूत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
भारतीय संघात मोहम्मद शमी, जसप्रीत बुमहार, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा असे प्रमुख गोलंदाज आहेत. तर पाकिस्तान संघात हसन अली, हरीस रौफ, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, शादाब खान आणि इमाद वसिम हे गोलंदाज आहेत.
भारतीय संघात सध्या जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकुटापुढे टीकाव धरणं भल्या भल्या फलंदाजांसमोर आव्हान असतं. तर आर अश्विन आणि रविंद्र जडेजा आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांना नाचवतात. पण सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीवर.
जसप्रीत बुमराह
भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 50 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत त्यात 59 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.66 इतकाआहे. यंदाच्या आयपीएलमध्ये बुमराहने तब्बल 21 विकेट्स घेतल्या आणि सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता.
मोहम्मद शमी
सीमचा बेताज बादशाह समजला जाणारा मोहम्मद शमी कोणत्याही संघासाठी धोकादायक ठरू शकतो. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या. शमीने 12 आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. युएईमध्ये शमीने चांगली कामगिरी केली आहे. त्याने या वर्षी आयपीएलमध्ये 19 विकेट घेतल्या आणि पाचव्या स्थानावर राहिला.
भुवनेश्वर कुमार
भारतीय संघाचा स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार बराच काळ दुखापतीचा सामना करत होता. पण त्याने यावर्षी इंग्लंडविरुद्ध पुनरागमन केलं आणि तेव्हापासून तो टीम इंडियाचा एक भाग आहे. यावर्षी त्याची कामगिरी विशेष नसली तरी दुबईच्या मैदानावर त्याची स्विंग गोलंदाजी आव्हानात्मक ठरू शकते. भुवीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही चांगली कामगिरी केली. डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर टाकण्यात भुवनेश्वर माहिर आहे. भुवनेश्वरने 51 आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.90 इतका आहे.
रवींद्र जडेजा
भारताचा नंबर वन अष्टपैलू रवींद्र जडेजावर यंदा मोठी जबाबदारी आहे. टीम इंडियासाठी जडेजा ट्रम्प कार्ड म्हणून सिद्ध होऊ शकतो. आयपीएलमध्येही जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 13 विकेट्स घेतल्या. जडेजाने 50 टी -20 सामन्यांमध्ये 7.10 च्या इकॉनॉमी रेटने 39 विकेट्स घेतल्या आहेत.
रविचंद्रन अश्विन
भारतीय संघातील सर्वात अनुभवी आणि फिरकी गोलंदाज म्हणजे आर अश्विन. त्याच्या गोलंदाजीत वेरिएशन आहे. त्यामुळे फलंदाजाला धावा करणं आव्हानात्मक ठरतं. शिवाय अश्विन याआधी पाकिस्तानविरुद्ध खेळला असल्याने त्याला पाकिस्तानी फलंदाजीचा कच्चा दुवा माहित आहे. अश्विनने 46 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत.
वरुण चक्रवर्ती आणि राहुल चाहर
वरुण चक्रवर्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नविन आहेत. पण आयपीएलमध्ये एक यशस्वी गोलंदाज म्हणून त्याने आपला छाम उमटवली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने तब्बल 18 विकेट्स घेतल्या. तर राहुल चहरही एक उत्कृष्ट लेग स्पीनर असून गुगली बॉल टाकण्यात तो माहिर आहे.
क्रिकेट जगतात एकेकाळी पाकिस्ताची गोलंदाजी सर्वाधिक धोकादायक आणि आक्रमक म्हणून ओळखली जात होती. पण सध्याच्या पाकिस्तानी संघात अनुभवी गोलंदाजांची कमतरता आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचं प्रमुख अस्त्र असेल ते म्हणजे युवा डावखुरा गोलंदाज शाहिन आफ्रिदी.
शाहिन शाह आफ्रिदी
20 वर्षांचा शाहिन वेगवान आणि स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा शाहिन अनुभवी नसला तरी तो धोकादायक नक्कीच ठरू शकतो. अगदी कमी कालावधीत त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. मोहम्मद आमिरऐवजी संघात स्थान मिळालेल्या अफ्रिदीने 30 सामन्यात 32 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 8.17 इतका आहे.
हरीस रौफ
ताशी 150 किमी वेगाने चेंडू टाकण्यासाठी प्रसिद्ध असेलला हरीस रौफ धोकादायक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पण वेग असला तरी लाइन लेंथ नसल्याने अनेकवेळा तो महागडा ठरला आहे. हरीसने पाकिस्तानसाठी 23 टी20 मॅचमध्ये 8.94 इकॉनॉमीच्या रेटने 28 विकेट घेतल्या आहेत.
हसन अली
पाकिस्तानच्या सध्याच्या संघातील सर्वात अनुभीव गोलंदाज म्हणजे हसन अली. हसनची टी20 क्रिकेटमधील कामगिरी दमदार आहे. पाकिस्तानसाठी हसनने 41 सामन्यात तब्बल 52 विकेट घेतल्या आहेत.
शादाब खान
पाकिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज शादाब खान अनेक काळ संघाबरोबर आहे. 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सान्यात शादाब भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला होता. शादाबने पाकिस्तानसाठी 53 सामन्यात 58 विकेट घेतल्या आहेत.
इमाद वसीम
पाकिस्तानचा अष्टपैली इमाद वसीम पॉवरप्लेमध्ये उपयुक्त गोलंदाज म्हणून ओळखला जातो. वसीने पाकिस्तानसाठी 52 सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत.