IND vs NZ : अंपायरनी विराटला मैदानातच झापलं

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला.

Updated: Mar 2, 2020, 04:55 PM IST
IND vs NZ : अंपायरनी विराटला मैदानातच झापलं title=

क्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने २ टेस्ट मॅचची ही सीरिज २-०ने गमावली. पण दुसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली वादात सापडला. अंपायर रिचर्ड कॅटलबर्ग यांनीही विराटला मैदानातच झापलं. न्यूझीलंडला १३२ रनचं आव्हान दिल्यानंतर भारताला लवकर विकेट घेण्याची गरज होती.

चौथ्या ओव्हरमध्ये टॉम लेथमने फाईन लेगला बॉल मारून एक रन काढली. यावेळी भारतीय फिल्डर 'टू रन' असं ओरडला. टॉम लेथम आणि टॉम ब्लंडेलने नसलेल्या २ रन काढाव्या, यासाठी भारताने ही रणनिती अवलंबल्याचा संशय अंपायरना आला. यानंतर अंपायरनी विराटला समज दिली. रिचर्ड कॅटलबर्ग यांना ४ वेळा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट अंपायरचा पुरस्कार मिळाला आहे.

'तू तिकडे टू रन म्हणालास, अशाप्रकारे ओरडू नका', असं अंपायर रिचर्ड कॅटलबर्ग विराट कोहलीला म्हणाले. यानंतर विराटने अंपायरला स्पष्टीकरण दिलं. फाईन लेगवर उभ्या असलेल्या फिल्डरला सतर्क करण्यासाठी टू रन असं ओरडल्याचं विराटने अंपायरला सांगितलं, पण विराटच्या या स्पष्टीकरणावरही अंपायर नाराज झाले. 'तू फिल्डरला सतर्क करत नव्हतास. खूप झालं,' असं म्हणत अंपायरनी त्यांचा संताप व्यक्त केला.

विराट कोहलीसाठी न्यूझीलंडचा हा दौरा अत्यंत खराब राहिला. तिन्ही फॉरमॅटच्या एकूण ९ इनिंगमध्ये विराटला फक्त २१८ रन करता आले. मोहम्मद शमीने टॉम लेथमची विकेट घेतल्यानंतर विराटने स्टेडियममधल्या प्रेक्षकांना बघून शिव्या दिल्या.

मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट पत्रकारावरही भडकला. 'मैदानातल्या तुझ्या वर्तणुकीबद्दल काय वाटतं? केन विलियमसन आऊट झाल्यानंतर तू त्याच्याकडे बघून ओरडलास. प्रेक्षकांनाही तू बोललास. भारताचा कर्णधार म्हणून तू एक चांगलं उदाहरण ठेवलं पाहिजेस असं वाटत नाही का? विराटने आक्रमकपणा कमी केला पाहिजे असं तुला वाटतं का?' असा प्रश्न पत्रकाराने विचारला.

पत्रकाराच्या या प्रश्नावर विराट चांगलाच संतापला. 'त्यावेळी नेमकं काय झालं याचा तुम्ही शोध घेतला पाहिजे. हे शोधल्यानंतर चांगला प्रश्न घेऊन या. तुम्ही इकडे नेमकं काय झालं याबाबत अर्धा प्रश्न आणि अर्धी माहिती घेऊन येऊ नका. तुम्हाला वादच निर्माण करायचा असेल, तर हे योग्य ठिकाण नाही. मी मॅच रेफ्री रंजन मदुगुले यांच्याशी बोललो आहे. याबाबत त्यांना काहीही आक्षेप नाही,' असं विराटने सांगितलं.