IND VS NZ 3rd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. मुंबईत पार पडणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडवर भारी पडेल अशी अपेक्षा होती मात्र तसं होताना दिसलं नाही. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी (Team India) धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ हा अजूनही 149 धावांनी आघाडीवर आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टेस्ट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या सुरुवातीला झालेला टॉस न्यूझीलंडने जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीची निवड केली आणि भारताला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. यावेळी भारताच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडने 10 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. यात सर्वाधिक धावा डॅरिल मिशेलन (82) आणि विल याँग(71) ने केल्या. तर भारताकडून रवींद्र जडेजाने 5, वॉशिंग्टन सुंदरने 4 तर आकाश दीपने 1 विकेट घेतली.
वानखेडेवर रंगलेल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने त्याच्या गोलंदाजीचा जलवा दाखवला. जडेजाने एका मागोमाग न्यूझीलंडचे 5 विकेट्स घेतले. जडेजाने विल याँग, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, मॅट हेन्री यांची विकेट घेतली. जडेजाने 22 ओव्हरमध्ये 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतले.
न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू आणि पुणे टेस्टमध्ये टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली फ्लॉप ठरले. दोघेही टीम इंडियासाठी फलंदाजी करताना मोठी कामगिरी करू शकले नाहीत. मात्र मुंबईत होणाऱ्या या टेस्ट सामन्यात रोहित आणि विराटच्या फलंदाजीची जादू चालेल अशी अपेक्षा होती, पण ते होऊ शकलं नाही. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा 18 बॉलमध्ये 18 धावा करून बाद झाला. तर विराट कोहलीने एका चुकीमुळे अवघ्या 4 धावा करून आपली विकेट घालवली. विराट रन आउट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला तर रोहित मॅट हेनरीच्या बॉलवर कॅच आउट झाला. दिवसाअंती टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 86 धावा केल्या आहेत.