भारताचा आघाडीचा फलंदाज के एल राहुल (KL Rahul) जखमी असल्याने इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी मालिकेला मुकला आहे. के एल राहुल अद्यापही दुखापतीमधून सावरला नसल्याने त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. 15 मार्चपासून राजकोट येथे भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. दुखापतग्रस्त के एल राहुलच्या जागी कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) संधी देण्यात आली आहे. दरम्यान के एल राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश दिल्याचा आरोप बीसीसीआयने (BCCI) केला आहे.
के एल राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सराव करतानाचे फोटो शेअर केल्याने तो बीसीसीआयच्या रडारवर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुखापतग्रस्त असतानाही केएल राहुलने चुकीचे सिग्नन दिल्याचा आरोप बोर्डातील या सूत्राने केला आहे. के एल राहुलच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान तो अद्यापही दुखापतीमधून सावरला नसल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, के एल राहुल दुखापतीमधून सावरण्यासाठी बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल आहे. आगामी कसोटी सामन्यात संघात पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीला बीसीयीआयने रवींद्र जाडेजासह के एल राहुलची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड केली होती. यादरम्यान ते वैद्यकीय पथकाच्या रिपोर्टची वाट पाहत होते. पण दुखापतीमुळे त्याला पुन्हा एकदा विश्रांती घ्यावी लागली आहे.
"के एल राहुल अद्याप राजकोटमध्ये दाखल झालेला नाही. रवींद्र जाडेजा संघासह जोडला गेला आहे. फिटनेस हे नेहमीच प्राधान्य राहिलं असून, बीसीसीआयची मेडिकल टीमला अद्यापही त्याच्याबद्दल खात्री नाही. जर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला आधीपासूनच राहुलची दुखापत कितपत गंभीर आहे याची माहिती असती तर तात्पुरत्या संघात कशाला ठेवलं असतं? खेळाडू त्याच्या फलंदाजीचे व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट करून चुकीचे सिग्नल का पाठवत आहेत,” असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने एनडीटीव्ही स्पोर्ट्सच्या हवाल्याने सांगितलं".
"के एल राहुलच्या फिटनेसवर आगामी सामन्यांमधील उपलब्धता अवलंबून असणार आहे. राजकोटमधील तिसऱ्या सामन्यातून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. राहुल सध्या 90 टक्के फिट आहे आणि बीसीसीआय मेडिकल टीमच्या देखरेखेखाली सुधारणा होत आहे," असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे.
देवदत्त पडिक्कल कर्नाटकचा डाव्या हाताचा फलंदाज आहे. के एल राहुलच्या जागी त्याला संधी देण्यात आली. रणजी ट्रॉफी सामन्यात 23 वर्षीय खेळाडूने 151 धावा ठोकल्या होत्या. निवड समिती अध्य़क्ष अजित आगरकर या सामन्यात उपस्थित होते. रणजी ट्रॉफीत त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात त्याने पंजाबविरोधात 193 धावा केल्या. गोव्याविरोधात 103 धावा केल्या. याशिवाय इंडिया अ कडून खेळताना अनुक्रमे 105, 65 आणि 21 धावा केल्या.