मुंबई : टीम इंडियाला इंग्लंडच्या भूमीवर वनडे मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
रोहित इंग्लंडच्या भूमीवर त्याच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. दुसऱ्या वनडेसाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. तर जाणून घेऊया कसं असणार आहे प्लेइंग इलेव्हन.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी सलामीच्या जोडीसोबत उतरणार आहे. गेल्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांनी आपल्या झंझावाती फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवून दिला होता. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात देखील हीच ओपनिंग जोडी पहायला मिळेल.
सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिला मोठा बदल करू शकतो. यामध्ये तो श्रेयस अय्यरच्या जागी धोकादायक अष्टपैलू शार्दुल ठाकूरला टीममध्ये संधी देईल. शार्दुल ठाकूर बॉलिंग आणि स्फोटक फलंदाजीमध्ये माहिर आहे.
लेगस्पिनर युझवेंद्र चहल टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव स्पिनर म्हणून खेळणार आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी रोहित शर्मा घातक यॉर्कर टाकण्यात उत्तम असलेल्या अर्शदीप सिंग या गोलंदाजाला संधी देईल.
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल.