सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. सोमवारी 11 जानेवारी हा सामन्याचा शेवटचा दिवस होता. सामना मनोरंजक ठरला होता. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या इनिंगमध्ये वरचढ दिसत होता. पण दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघांने चांगली कामगिरी करत पराभव टाळला.
भारत हा सामना जिंकेल अशी शक्यता वाटत होती. पण ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराची विकेट पडताच ही आशा मावळली. भारत या सामन्यात पराभव रोखण्यात यशस्वी झाला. भारताने 5 गडी गमावले होते. क्रीजवर हनुमा विहारी आणि आर अश्विन होते. दोघांनीही जवळपास 250 चेंडूंचा सामना केला, परंतु विकेट गमवली नाही. त्या जोरावर भारताने सामना अनिर्णित ठरवला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 338 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 244 धावा करु शकला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाने दुसर्या इनिंगमध्ये 312 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारतापुढे विजयासाठी 407 धावांचे लक्ष्य ठेवले गेले.
सामन्याच्या पाचव्या दिवसा अखेरीस भारताने 131 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 334 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संग 73 धावांनी मागे राहिला. भारताकडून सामना हनुमा विहारी आणि आर अश्विनने वाचविला. विहारीने 161 चेंडूत 23 आणि अश्विनने 128 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या.
पाचव्या दिवशी 32 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 98 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केलेल्या भारतीय संघाला कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपात पहिला धक्का बसला. तो केवळ 4 धावा करु शकला. चेतेश्वर पुजाराने 170 चेंडूत आपले दुसरे अर्धशतक ठोकले. यापूर्वी तो पहिल्या डावातही 50 धावांवर बाद झाला होता. 118 चेंडूत 97 धावा करणारा ऋषभ पंतच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला.
जोश हेजलवूडच्या बॉलवर क्लीन बोल्ड झालेल्या चेतेश्वर पुजाराच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बसला. सहाव्या विकेटसाठी हनुमा विहारी आणि आर अश्विनची धावांच्या बाबतीत मोठी भागीदारी झाली नाही. परंतु दोघांनीही जवळपास 250 चेंडूंचा सामना केला आणि भारताचा पराभव रोखला.