बॉर्डर-गावसकर मालिकेआधी स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीबाबत केला गंभीर आरोप

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू स्टीव्ह स्मिथने भारतातील खेळपट्ट्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated: Jan 31, 2023, 06:42 PM IST
बॉर्डर-गावसकर मालिकेआधी स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीबाबत केला गंभीर आरोप  title=

India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 2017 नंतर पाहुणा कांगारूंचा संघ पहिल्यांदाच भारतामध्ये येणार असून दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू स्टीव्ह स्मिथने भारतातील खेळपट्ट्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (ind vs Aus Before the BorderGavaskar series Steve Smith made serious allegations about the pitch  latest marathi sport news)

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या मालिकेआधी एकही सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर सराव सामना खेळण्यापेक्षा नेटमध्ये सराव केलेला बरा, असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला. सराव सामन्यामध्ये पाटा खेळपट्ट्या आणि मालिकेमधील मुख्य सामन्यांमध्ये फिरकीला पुरक खेळपट्ट्या तयार केल्या जातात, असा दावा स्मिथने केला आहे. 

ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कारकिर्दीमध्ये एकदा दोनदा नाहीतर तब्बल चारवेळा देशाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूच्या पुरस्कारावर स्मिथने नाव नोंदवलं आहे. भारतात रवाना होण्याआधी ऑस्ट्रिलियाच्या संघाच्या स्मिथने माध्यमांशी बोलताना यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सराव सामना खेळणार नसल्याचं सांगितल्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. मात्र स्मिथने खेळपट्ट्यांचं कारण पुढे करत सराव सामने खेळणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. 

आम्ही नेटमध्ये सराव करून आमच्या स्पीनर्सला जास्तीत जास्त बॉलिंग करायला लावून अभ्यास करू, आम्ही मैदानात उतरण्याची वाट पाहत आहोत. सराव सामन न खेळण्याचा निर्णय योग्य आहे. कारण मागील वेळी सराव सामन्यामध्ये गवत असलेली खेळपट्टी बनवली होती आणि प्रत्यक्षात सामन्यावेळी आम्हाला फिरकीपटूंना सामोरं जाताना खूप कठीण गेलं होतं असं स्टीव्ह स्मिथने सांगितलं. 

दरम्यान, स्टीव्ह स्मिथने आता चालू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. सिडनी सिक्सर्सकडून खेळताना स्मिथने दोन शतके मारत फॉर्ममध्ये परतल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना स्मिथला आऊट करण्याचं एक आव्हान असणार आहे.