बाबर आझमकडे पुन्हा कर्णधारपद... 'या' खेळाडूने निवडली विश्वचषकातील फ्लॉप XI

Sreesanth picks World Cup 2023 Flop XI : आयसीसी विश्वचषकात कोणता संघ पटकावणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलीय. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. 

राजीव कासले | Updated: Nov 16, 2023, 05:15 PM IST
बाबर आझमकडे पुन्हा कर्णधारपद... 'या' खेळाडूने निवडली विश्वचषकातील फ्लॉप XI title=

Sreesanth picks World Cup 2023 Flop XI: आयसीसी विश्वचषक आता शेवटच्या टप्प्यात आहे. विश्वचषकाचा मानकरी कोण होणार हे 19 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत फायनल गाठलीय. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही पराभव पत्करलेला नाही. सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम केलाय. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने दमदार कामगिरी केलीय. टीम इंडियाच्या टॉप फाईव्ह फलंदाजांपैकी चार फलंदाजांनी शतकं केलीत. यात विराट कोहलीच्या नावावर तीन शतकं आहे. तर गोलंदाजीत पाचही गोलंदाजांनी विरोधी टीमला उद्धव्स्त करण्याचं काम केलंय. यात सर्वाधिक विकेट घेतल्यात ते मोहम्मद शमीने.

श्रीसंतने निवडली फ्लॉप XI
या दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने (S. Sreesanth) यंदाच्या विश्वचषकात अपयशी ठरेलल्या खेळाडूंची प्लेईंग इलेव्हन बनवली (ICC Cricket World Cup 2023 Flop XI) आहे. यंदाच्या विश्वचषकात अनेक दिग्गज खेळाडू अक्षरश: फ्लॉप ठरले. नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी त्यांची अवस्था होती. अशाच काही खेळाडूंना श्रीसंतने आपल्या फ्लॉप इलेव्हनमध्ये निवडलं आहे. 

बाबर आझम कर्णधार
श्रीसंतने WC Flop XI च्या कर्णधारपदी पाकिस्तानच्या बाबर आझमची निवड केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय सुमार झाली. नऊ पैकी पाच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. इतकंच काय तर स्वत: बाबर आझमही फ्लॉप ठरला. बाबर आझमला 9 सामन्यात  320 धावाच करता आल्या. बाबर शिवाय पाकिस्तानच्या चार खेळाडूंचा या संघात समावेश केला आहे. यात शादाब खान, मोहम्मद नवाज आणि पाकिस्तानचा हुकमी वेगवान गोलंदाज हारिस रौफचाही समावेश आहे. 

याशिवाय इंग्लंडच्या जोस बटलर आणि जो रुटचाही संघात समावेश आहे. बटरलने नऊ सामन्यात केवळ 138 धावा केल्या. तर रुटला नऊ सामन्यात केवळ 276 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथही या स्पर्धेत खास कामगिरी करु शकलेला नाही. स्मिथने नऊ सामन्यात केवळ 268 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचाही फ्लॉप इलेव्हनमध्ये समावेश आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनच्या या स्पर्धेतील वागवणूकीवर श्रीसंतने नाराजी व्यक्त केली आहे. शाकिब हसनने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजविरोधात टाईम आऊट मागितला होता. ज्यामुळे मॅथ्यूजला मैदानावर येताच बाद घोषित करण्यात आलं. शाकिबच्या या निर्णयावर जगभरातून टीका झाली. 

श्रीसंतच्या या संघात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. पण फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्ब बावुमा सुपर फ्लॉप ठरला. बावुमाने दहा सामन्यात केवळ 145 धावा केल्यात. 

World Cup 2023 Flop XI: बाबर आझम (कर्णधार), जोस बटलर (उपकर्णधार), जो रूट, स्टीव स्मिथ, टेम्बा बावुमा, शाकिब अल हसन, शादाब खान, मोहम्मद नबी, मोहम्मद नवाज, महेश थीक्षाना, हारिस रऊफ